(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli : हेलिकॉप्टर खरेदी करायचं आहे, कर्ज द्या; हिंगोलीच्या शेतकऱ्याची बँकेकडे मागणी
शेती परवडत नाही म्हणून हेलिकॉप्टर खरेदी करायचं आणि ते भाड्याने द्यायचं असं योजना हिंगोलीतील शेतकऱ्याने आखली असून त्यासाठी त्याने बँकेकडे कर्ज मागितलं आहे.
हिंगोली : शेती परवडत नाही म्हणून हेलिकॉप्टरचा व्यवसाय करायचा आहे, त्यासाठी कर्ज द्या अशी अजब मागणी हिंगोलीतील शेतकऱ्याने बँकेकडे केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्याने बँकेकडे कर्ज मागितले आहे. शेतकऱ्याच्या या अजब मागणीची या परिसरात चांगलीच चर्चा आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा येथील शेतकरी कैलास पतंगे यांना वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. दरवर्षी होणारा अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ या निसर्गाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतीतून त्यांना कोणताही नफा होत नाही. दरवर्षी शेती तोट्यात जाते.
शेती तोट्यात जात असल्याने शेतकरी कैलास पतंगे यांनी हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय करायचं ठरवलं. कारण सध्या हेलिकॉप्टर भाड्याने देण्याच्या व्यवसायामध्ये स्पर्धा नाही असं त्यांचं मत आहे. त्याचबरोबर हेलिकॉप्टर भाड्याने दिल्यानंतर तासी हजारो रुपये भाडे मिळते हे लक्षात आल्याने शेतकरी कैलास पतंगे यांनी हा व्यवसाय करायचा ठरवला आहे. परंतु हा व्यवसाय करायचा म्हटल्यावर हेलिकॉप्टर लागणार, मग हेलिकॉप्टर खरेदी करायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कारण जवळ असलेली दोन एकर शेती जरी विकली तरीही हेलिकॉप्टर खरेदी करण्याइतकं पैसे त्या शेतीमधून मिळू शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी कैलास पतंगे यांनी भारतीय स्टेट बँक, शाखा गोरेगाव यांच्याकडे हेलिकॉप्टर खरेदीसाठी कर्ज मिळावे यासाठी कर्जाचा प्रस्ताव सुद्धा दाखल केला आहे.
शेतकरी कैलास पतंगे यांनी बँकेला विनंतीसुद्धा केली आहे, साहेब, माझी शेती गहाण राहू द्या, मला हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय करायच आहे. त्यासाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कर्ज द्या अशी अजबच कर्जाची मागणी हिंगोलीतल्या शेतकऱ्याने बँकेकडे केले आहे. आता भारतीय स्टेट बँक शाखा गोरेगाव येथील बँक प्रशासन या शेतकऱ्याला हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कर्ज देणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
हिंगोलीतील शेतकऱ्याच्या या मागणीमुळे शेतकऱ्यांच्या समस्या देखील समोर आल्या आहेत. व्यंगात्मक का असेना या शेतकऱ्याने यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केल्याचं काही लोकांनी म्हटलं आहे.