वरिष्ठांच्या बेकायदा आदेशांना नाही म्हणायला शिका, FIR रद्द करत हायकोर्टाने पोलीस अधिका-याला ठोठावला दंड
सोशल मीडिया पोस्टवरून पुणे पोलीसांनी दाखल केलेला एफआयआर रद्दडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वक्तव्याचं प्रकरण
Bombay High Court : पोलीस अधिका-यांनी वरिष्ठांच्या कायदाबाह्य आदेशांना नाही म्हणायला शिकायला हवं. शक्य नसेल तर किमान तश्या लेखी आदेशांची मागणी करावी. असं महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ता संदीप कुदळेला मोठा दिलासा दिला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून पुणे पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर हायकोर्टकडून रद्द करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल कुदळे यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. एकाच गुन्ह्यासाठी दोन गुन्ह्यांची गरजच काय?, असा शेरा हायकोर्टानं मारला आहे. इकतंच नव्हे तर बेजबाबदारपणे गरज नसताना थेट गुन्हा दाखल करत बेकायदेशीररित्या अटक केल्याबद्दल संबंधित पोलीस अधिका-याला हायकोर्टानं आर्थिक दंडही ठोठावला आहे. दंडाची 25 हजारांची रक्कम त्यांच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर संदीप कुदळेनं त्यांच्या पुण्यातील घराबाहेरून सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. याबद्दल पुणे पोलिसांनी संदीप कुदळेविरोधात दाखल दुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती. 18 जानेवारी रोजी यावरील सुनावणी पूर्ण करत हायकोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. यात राज्य सरकारच्यावतीनं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी स्पष्ट केलं की, पोलीसांना त्यांच्या पातळीवर काम करत असताना प्रचंड दडपण असतं. त्यामुळे जर एखाद्यावेळी त्यांना तातडीनं गुन्हा दाखल करावासा वाटला तर त्यात त्यांची चूक नाही. मात्र असं असलं तरीही पोलीसांनी गुन्हा दाखल करताना काळजी घ्यायला हवी, यात सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि वेळ वाया जातोय, याचं भान राखायला हवं. एकाच प्रकरणातं विविध ठिकाणी गुन्हे दाखल करता येत नाहीत, कायद्यानं त्यापैकी एकच गुन्हा दखलपात्र राहतो हो गोष्टी पोलीसांनी ध्यानात का राहत नाही?, असा सवालही हायकोर्टानं सुनावणी दरम्यान उपस्थित केला होता.
काय आहे प्रकरण -
संदीप कुदळेनं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फुले आणि आंबेडकरांवरील विवादीत वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रात्री बारा वाजता त्यांच्या कोथरुडमधील बंगल्याबाहेर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केला. संदीप कुदळेला पोलिसांनी अटक करत समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला होता.