(Source: ECI/ABP News/ABP Majha)
साताऱ्यात जामीन, तर गिरगाव कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी; सदावर्तेंचा स्वत:साठी युक्तिवाद
Gunratna Sadavarte : कुठे दिलासा, तर कुठे कोठडी, सदावर्तेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत, तर साताऱ्यात जामीन मंजूर
Gunratna Sadavarte : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईच्या गिरगाव न्यायालयानं न्यायालयीनं कोठडी सुनावली आहे. तर सातारा कोर्टाकडून सदावर्तेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गिरगाव कोर्टात सुनावणीदरम्यान वकील गुणरत्न सदावर्तेंनी स्वतः कोर्टात बाजू मांडली. जवळपास 48 हजार एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 200 ते 300 रुपये घेतल्याची माहिती स्वतः सदावर्तेंनी न्यायालयात दिली. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळ्या केलेल्या पैश्यातून सदावर्तेंनी मुंबईत मालमत्ता खरेदी केल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. हर्षद मेहता केसचा दाखला देत, सदावर्तेंचाही तपास करणं गरजेचं असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा युक्तीवाद
वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात आणलं असून सुनावणी सुरु आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या युक्तीवादानंतर स्वतः सदावर्ते युक्तिवाद करत आहेत. सदावर्ते म्हणाले की, मान्य करतो की मी एसटी कर्मचाऱ्यांकडून 200 ते 300 रुपये घेतले, ते माझ्या मर्जीने घेतले. पण एकाही कर्मचाऱ्यानं याबद्दल तक्रार केली नाही आहे. माझ्याकडे एसटीचे 48 हजार क्लायन्ट होते. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो ते पोलिसांनी कोर्टाला सांगावं. माझ्या घरातून माझा वकालतनामा मिळाला आहे मात्र इथे हर्षद मेहता केसचा दाखला देण्यात आला. हर्षद मेहताची केस कुठे? माझी केस कुठे? 3 हजारांची पैसे मोजण्याची मशीन मिळाली आहे, आपण मुंबईत आहोत. गाडी जुनी आहे आणि 2014 साली खरेदी केली आहे, त्याचा आरटीजीएस देखील आहे. माझ्या अकाऊंटवरुन पैसे गेले आहेत. त्याची माहिती तुम्हाला तशीच मिळेल. माझ्या कस्टडीची गरजच काय? सोबतच परळमधील वन रुम किचनचं घर मी 2017 साली घेतलं आहे. त्याचा आणि याचा काय संबंध? माझ्या घरातून लेजर मिळालं, असं दाखवलं काही महत्त्वपूर्ण कागदपत्र मिळाली. शिवाय माझ्या घरी सध्या माझी फक्त मुलगी आहे. ती पोलिसांना सहकार्य करत आहे.