पांढऱ्या सोन्याला यंदा 5825 रुपये हमीभाव! कापूस नोंदणी प्रक्रिया सुरु
कापूस नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून यावेळी लांब धाग्याच्या कापसाला प्रती क्विंटल 5825 असा हमीभाव मिळणार असल्याने आता शेतकरी नोंदणी केंद्राकडे विचारपूस करण्यासाठी बाजार समितीमध्ये येताना दिसत आहेत.
यवतमाळ : जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी कापसाची लागवड करतात. मागील हंगामाचा कापूस पणन महासंघाला जून महिन्यांपर्यत खरेदी करावा लागला होता. यंदा मात्र मागील वेळी झालेली धावपळ न बघता पणन महासंघ आणि सीसीआयने कापूस खरेदीच्या अनुषंगाने कापूस नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून जिल्हाभर सुरु केली आहे. यावेळी लांब धाग्याच्या कापसाला प्रती क्विंटल 5825 असा हमीभाव मिळणार असल्याने आता शेतकरी नोंदणी केंद्राकडे विचारपूस करण्यासाठी बाजार समितीमध्ये येताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापूस लागवड केली जाते. खरिपात जिल्ह्यात 9 लाख हेक्टरपैकी साधारण 5 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड केली आहे.
कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पावसाळा सुरु झाला तेव्हापर्यंत कापूस खरेदी करावी लागली होती. त्यात अनेक ठिकाणी बोगस नोंदणीसुद्धा झाल्या होत्या त्यामुळे कापूस खरेदी करताना मोठा गोंधळ उडाला होता. आता शेतकऱ्यांनीच कापूस खरेदी केला जावा या दृष्टीने कापसाची पूर्व नोंदणी सुरु केली आहे. कापूस खरेदीमध्ये कुठेही गडबड होऊ नये म्हणून पणन आणि सीसीआयचे लवकरच एक मोबाईल अँप सुद्धा पुढील काही दिवसात आणणार आहे. शिवाय कापूस नोंदणीसाठी यंदा जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी ग्रीन कार्ड तयार केले जाणार आहे. शासनाची कापूस खरेदी सुरु झाल्यावर नोंदणी केलेले शेतकरी तात्काळ कापूस विक्री करू शकतील. या ग्रीन कार्डद्वारे व्यापारी गैरफायदा घेऊ शकणार नाही, अशी यात प्रक्रिया आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली आहे.
कापूस नोंदणीसाठी शेतकरी यांनी चालू हंगामातील सातबारा त्यावर कापूस पेरा किती आहे, हे त्यावर गावचे तलाठी यांच्याकडून नोंदणी करून सातबारा अद्यावत असणे आवश्यक आहे. बँक पासबुक झेरॉक्स सुध्दा नोंदणी करतांना आवश्यक आहे. सध्या ऑफलाईन नोंदणी केली जाईल नंतर अँपद्वारे सुद्धा नोंदणीची माहिती ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चालू हंगामातील सातबारा अद्यावत नोंदणी करून ठेवणे आवश्यक आहे, असे यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोके यांनी सांगितले आहे. यंदा प्रत्येक बाजार समितीमध्ये 2 रजिस्टर ठेवण्यात येणार आहे. ज्यात तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 1 रजिस्टरमध्ये नोंदणी केली जाईल, तर दुसऱ्या रजिस्टरमध्ये तालुक्यातील बाहेरच्या शेतकरी यांच्या नावाची नोंदणी केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना लांब धाग्याचा कापसासाठी प्रती क्विंटलला ₹5825 तर मध्यम धाग्यासाठी ₹5725 ते ₹5515 रुपयांपर्यंत प्रती क्विंटल असा हमीभाव मिळणार आहे. कापसाच्या ग्रेडनुसार त्याला पुढे भाव निश्चित होतील. मागील हंगामात पणन महासंघाने 9 कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून 10 लाख 55 हजार क्विंटल कापूस खरेदी केला होता. तर सी सी आय ने 10 केंद्राच्या माध्यमातून 21 लाख 53 हजार क्विंटल कापूस खरेदी केला होता. यंदाही एवढीच खरेदी प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांना कापूस खरेदी होणार नाही यासाठी ग्रीन कार्डची संकल्पना पढे आली आहे.
शेतकरी नोंदणी सुरु झाली तरी कापूस खरेदी तात्काळ सुरु करावी असे शेतकरी म्हणत आहे. शेतात कापूस वेचायला आला असून ही कापुस खरेदी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सुरु करावी जेणे करून खेडा खरेदीमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबेल असे महागाव येथील शेतकरी मनिष जाधव आणि यवतमाळ येथील शेतकरी सिकंदर शहा यांनी म्हटले आहे. आता शेतकरी नोंदणीसाठी बाजार समितीमध्ये चौकशीसाठी येताना दिसतोय. ही कापूस खरेदी लवकर सुरु व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, ही खरेदी केव्हा सुरु होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी चार चाकी वाहनातूनच कापूस विक्रीस आणावा सहा चाकी वाहनामध्ये कापूस विक्रीस घेऊन येवू नये, असेही जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले आहे.
मागिल वर्षी पणन महासंघाचे जिल्ह्यात यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, आर्णी, दिग्रस, पुसद, उमरखेड, गुंज खडका या केंद्रावर कापूस खरेदी झाली होती. तर सीसीआयची कापूस खरेदी जिल्ह्यातील वणी, शिंदोला, पांढरकवडा, घाटंजी, राळेगाव, वाढोना बाजार, खैरी, मारेगाव, मुकुटबंन आणि दारव्हा येथे कापूस खरेदी केंद्र होते.