सरकारी कार्यालयांवर भगवा फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा सरकारचा आदेश, अॅड सदावर्तेंचा विरोध
सरकारी कार्यालयांवर भगवा ध्वज फडकवणे म्हणजे संविधानाच्या 362 कलमानुसार संपुष्टात आलेली राजेशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासारखं आहे अशी टीका अॅड. सदावर्ते यांनी केली आहे. तर कोणत्याही परिस्थितीत शिवराज्याभिषेक दिन साजरा होणारच असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
मुंबई : भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते असं मत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मांडलं आहे. 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तशा प्रकारचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर अॅड. सदावर्ते यांनी टीका करत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे.
अॅड. सदावर्ते आणि अॅड. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक लेखी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत असं म्हटलं आहे की, भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वज संहिता 2002-2006 नुसार सरकारी कार्यालयावर फक्त राष्ट्रध्वज फडकवण्याची मुभा आहे. त्यामुळे भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते. उद्या कुणीही येईल निजामचा ध्वज लावा, मोगलांचा झेंडा लावा, पेशव्यांचा झेंडा लावा म्हणू शकतो, किंवा सम्राट अशोकाचा ध्वज फडकावा असेही म्हणेल. संविधानाच्या 362 कलमानुसार संपुष्टात आलेली राजेशाही पुन्हा प्रस्थापित करणारा हा निर्णय आहे. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी अन्यथा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही सदावर्ते यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
शिवराज्यभिषेक दिनाचे धार्मिक अवडंबर करु नये. शिवराज्याभिषेक केवळ राजदंड व भगवा झेंडा उभारुन साजरा करण्याचं आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
शिवस्वराज्य दिन रोखण्याची कुणाची ताकद आहे?, मुश्रीफांचं प्रत्युत्तर
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवस्वराज्य दिनी भगवा फडकवण्याला विरोध केल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा होणारच असं सांगत सदावर्ते यांना भाजपची फूस असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
रविवारी होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आता 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना 1 जून रोजी तशा प्रकारचा सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे.
त्यामुळे उद्या होणारा शिवस्वराज्य दिन कसा साजरा करायचा यावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- यापुढे ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये 6 जूनला 'शिवस्वराज्य दिन' साजरा होणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
- Shivaswarajya Din Celebration | महाराष्ट्रात 6 जूनला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 'शिवस्वराज्य दिन' साजरा करण्यासाठी नियमावली जारी
- Maharashtra Unlock : पाच स्तरात महाराष्ट्र अनलॉक होणार, तुमचा जिल्हा/शहर कोणत्या लेवलमध्ये?