(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : गोगलगायीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार, प्रस्ताव पाठवण्याचे सरकारचे आदेश
गोगलगायीमुळं (Snail) मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन (Soybean) पिकाच मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Agriculture News : गोगलगायीमुळं (Snail) मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन (Soybean) पिकाच मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे.
1 लाख 63 हजार 889 हेक्टर क्षेत्र गोगलगायीनं बाधित
बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला गोगलयीचा मोठा फटका बसला होता. या जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचं नुकसान झाल्यामुळं शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती. अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांसह राज्यात अन्य काही भागातील 1 लाख 63 हजार 889 हेक्टर क्षेत्र गोगलगायीनं बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनास द्यावेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा अधिक असेल त्यांना मदतीसाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त व संबंधित जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत.
तीन-चार पेरण्या करुनही सोयाबीन वाया
बीड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील सोयाबीन पिक उगवल्यानंतर गोगलगायीनी शेंडे खाऊन फस्त केले होते. मोठ्या प्रमाणात शेतात आढळलेल्या गोगलगायींना गोळा करुन मीठ लावून त्यांना नष्ट करत होते आणि पुन्हा पेरणी करत. अनेक शेतकऱ्यांना तर तीन-चार पेरण्या करुनही हाती काही लागण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळं या बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी करुन, शेतकऱ्यांशी व स्थानिक प्रशासन, कृषी विभाग आदींशी चर्चा करुन धनंजय मुंडे यांनी सुरुवातीपासून राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील नुकसानग्रस्त असलेल्या अंबाजोगाई आणि लातूर जिल्ह्यातील शेतीची पाहणी केली होती. दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात, लक्षवेधी तसेच विविध संसदीय आयुधे वापरुन या दोनही नेत्यांसह विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनीही गोगलगायीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारनं नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश पारित केले आहेत. यामुळं गोगलगायी ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दखल घेतल्याचे समाधान, मात्र मदत सरसकट द्या : धनंजय मुंडे
हजारो हेक्टरवरील सोयाबीन क्षेत्राच्या चार-चार पेरण्या करुनही शेतकऱ्यांना गोगलगाय नियंत्रण करता आले नाही. पीकही हाती लागणार नाही. अशा बिकट परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या परिस्थितीची, आमच्या मागणीची सरकारने दखल घेतली याचे समाधान आहे. मात्र, या पेरण्यांचा खर्च किती वाया गेला असेल याचा अंदाज सरकारने लावणे गरजेचे आहे. नुकसानीची आकडेवारी व शेतकऱ्यांची दयनीय अवस्था समोर असताना पुन्हा निकष, पंचनामे, 33 टक्के कशासाठी? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. गोगलगायीने ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये थेट मदत देण्यात यावी, या मागणीवर आम्ही ठाम असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Snail Attack on Soybean : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी संतप्त, रेणापूर तहसील कार्यालयात सोडल्या गोगलगायी