Gondia News : नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी आजपासून पुढील तीन महिने राहणार बंद; नेमकं कारण काय?
Gondia News : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वन वैभव आणि वनप्राण्यांचं हमखास दर्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहे.
गोंदिया : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वन वैभव आणि वनप्राण्यांचं हमखास दर्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहे. 1 जुलैपासून ते पुढील 30 सप्टेंबरपर्यंत अशी तीन महिन्यांपर्यंत इथली जंगल सफारी आता बंद राहणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून जंगलातील अंतर्गत रस्ते पर्यटकांची वाहने या मार्गावरून चालविणे जिकरीचे असतात. सोबतचं पावसामुळं जंगलातील वन्य प्राण्याचं दर्शन होत नाही. त्यामुळं या तीन महिन्यांच्या कालावधीत येथील सर्व प्रकारच्या पर्यटनाची ऑनलाईन आणि ऑफलाईन बुकिंग बंद केली आहे. त्यामुळे आता वन्यप्रेमीना जंगल सफारीसाठी 3 महीने वाट पहावी लागणार आहे.
पुढील तीन महिने राहणार जंगल सफारी बंद
विदर्भात विपुल प्रमाणात वन संपदा आहे. सोबतच येथील व्याघ्र प्रकल्पात हमखास होणाऱ्या वाघांच्या दर्शनासह जंगल अनुभवण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक विदर्भाची वाट निवडतात. अशातच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वन वैभव असलेल्या नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पात हौशी पर्यटकांना या उन्हाळ्यात T4 वाघीण तिच्या चार बछड्यांसह पानवठ्यांवर मुक्त जलविहार करताना दिसून आली. त्यामुळं भंडारा जिल्ह्यातील पिटेझरी गेटवरून मोठ्या प्रमाणात देश विदेशातील पर्यटकही इथं T4 वाघिणीच्या कुटुंबाच्या दर्शनासाठी जंगल सफारीवर आलेत. यात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीनं एप्रिल, मे आणि जून महिन्यातील 6377 पर्यटकांनी जंगल सफारी केली. यात 5 ते 12 वर्ष वयोगटातील 411 बालकांचा समावेश आहे. तर एप्रिल महिन्यात 834 पर्यटकांनी जंगल सफारी केली.मे मध्ये 2697 आणि जून महिन्यात 2846 पर्यटकांनी जंगल सफारी केलीय. मात्र, आता पुढील तीन महिने इथली जंगल सफारी बंद राहणार आहे.
शेवटच्या दिवशी सोनम वाघीण अन् तिच्या 3 बच्चड्यांचे मनसोक्त दर्शन
नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पा प्रमाणेच चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पही आजपासून सफारीसाठी बंद असणार आहे. अशातच पर्यटन हंगामाच्या शेवटच्या दिवशी सोनम वाघीण आणि तिच्या 3 बच्चड्यांनी पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिलंय. वन्यजीव छायाचित्रकार श्रीपाद पिंपळकर यांनी आपल्या कॅमेरात कैद हे दृश्य कैद केलंय. काल ताडोबात पर्यटनाचा शेवटचा दिवस होता. तर आज पासून म्हणजे 1 जुलै ते 31 सप्टेंबर पर्यंत पावसाळ्यात 3 महिने पर्यटकांना ताडोबात नो एन्ट्री असणार आहे. मात्र काल शेवटचा दिवस आणि रविवार असल्याने ताडोबात व्याघ्र दर्शनाच्या अपेक्षेप्रमाणे पर्यटकांची तुडुंब गर्दी होती. यावेळी मोठ्या अपेक्षेने ताडोबात गेलेल्या पर्यटकांना मोहर्ली गेटच्या अगदी जवळ सोनम आणि तिच्या बच्चड्यांचे दर्शन झाले. रस्त्याच्या अगदी बाजूला सोनम बच्चड्यांचा लाड करत असल्याचे विलोभनीय दृश्य अनेक पर्यटकांनी नजरेज आणि कॅमेरात यावेळी कैद केले.
इतर महत्वाच्या बातम्या