Gokul Milk: 'गोकुळ'ची सभा गोंधळात पार, सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी
कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळची सभा यंदादेखील गोंधळात पार पडली. सत्ताधारी महाडिक गट आणि विरोधी सतेज पाटील गट आमने-सामने आल्याने गोंधळ निर्माण झाला. गोकुळमध्ये ज्याचं वर्चस्व त्याच्या हातात जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या असं काहीसं सूत्र आहे.
कोल्हापूर: जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा यंदादेखील गोंधळात पार पडली. दरवर्षी विविध कारणांनी ही सभा वादळी ठरत असते. येत्या काही महिन्यात गोकुळची निवडणूक लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची ही सभा महत्वाची होती. यावेळी सतेज पाटील गट आणि सत्ताधारी महादेवराव महाडिक गट आमने-सामने आले.
गेल्या वर्षीची सभा झालीच नाही तरीही सभा पार पडली असं अहवालात का लिहिलं आहे असा सवाल विरोधकांनी केला. त्यावेळी दोन गट एकमेकांसमोर आल्याने सभा मंडपात एकच गोधंळ उडाला. आम्हाला शांततेत सभा सुरु ठेवायची आहे मात्र विरोधक मुद्दाम गोंधळ घालत असल्याचं गोकुळचे हंगामी अध्यक्ष अरुण नरके यांनी म्हटलंय. यावर विरोधकांनी टीका करत सांगितलं की सत्ताधाऱ्यांना सभा आणि सभेतील विषय समोर येऊच द्यायचे नाहीत.
जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहे. राज्याच्या सहकार खात्याकडून तसे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. आजची सभा ही त्याचीच एक तयारी असल्याचं सांगण्यात येत होतं.
आज 'गोकुळ'ची सभा, खुर्च्या बांधल्या, सभामंडपात सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्त, सभा वादळी होण्याची शक्यता
दररोज 14 लाख लिटरपेक्षा जास्त दुधाचं संकलन या संघातर्फे करण्यात येतंय. गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गोकुळवर एक हाती सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आव्हान दिलं. गेल्या वेळी सत्ता मिळवण्यात अपयशी ठरलेल्या सतेज पाटलांनी या वेळी गोकुळची सत्ता मिळवायचीच असा चंग बांधला आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साथीनं अनेक महाडिक विरोधी लोकांना एकत्रित आणलंय.
गोकुळमध्ये ज्याचं वर्चस्व त्याच्या हातात जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या असं काहीसं सूत्र आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघ हा आपल्या गटाकडे राहावा यासाठी महादेवराव महाडिक गट आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा गट नेहमी आमने-सामने येत असतो. सर्वसाधारण सभेमध्ये हे दोन्ही गट एकमेकांसमोर भिडत असतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा दूध संघ आपल्याकडे असावा असं दोन्ही गटांचे म्हणणं आहे.
पहा व्हिडीओ: Gokul Milk Kolhapur : 'गोकुळ'च्या वार्षिक सभेआधीच गोंधळ, अध्यक्ष मात्र रविंद्र आपटे अनुपस्थित