कोरोना मृत्यूदर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत टास्क फोर्सच्या डॉक्टर्सची बैठक
धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती. तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
मुंबई : कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणे करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल. तसेच मृत्यूदर देखील झपाट्याने कमी होऊ शकेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यूदर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आणि चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, मृत्यूदर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट्य असले पाहिजे. त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत, तसेच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे. म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आयोजित केली. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहे. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती. तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
डॉ तात्याराव लहाने यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले. टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी यावेळी सांगितले की, वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे दिली जातात, त्याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. नको तिथे अनावश्यक औषधी देऊ नये. अडचण येईल तेव्हा तत्काळ आम्हाला संपर्क करा. डॉ राहुल पंडित म्हणाले की, ही विशेष औषधे महत्वाची नाहीत तर रुग्णांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. ऑक्सिजन उपलब्ध ठेवणे खूप आवश्यक आहे.
डॉ शशांक जोशी, डॉ मुफ्फझल लकडावाला यांनी देखील उपचारांविषयी जिल्ह्यांच्या डॉक्टर्स व शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली व शंका निरसन केले, उपचाराविषयी सूचना केल्या. या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांचीही उपस्थिती होती.