(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावधान! महामार्गावर प्रवाशांना अॅपच्या मदतीने लुटणारी टोळी सक्रिय
लॉकडाऊनमुळे राज्यातील महामार्ग ओस पडलेत. प्रत्येक मार्गावरून एकावेळी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच वाहनांची ये-जा सुरू असते. याचा फायदा घेऊन काही टोळ्या सक्रिय झाल्यात.
लॉकडाऊनमध्ये तुम्ही महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण अनेक महामार्गावर काही टोळ्या सक्रिय झाल्यात. त्या तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकवून तुमची लूट करतायेत. यासाठी नवीन शक्कल त्यांनी लढवली आहे. म्हणूनच महाराष्ट्र पोलिसांनी प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचं आवाहन केलंय.
महामार्गावरून तुम्ही प्रवास करत असताना, तुमच्या पाठीमागून एका गाडीत टोळी येते. तुमच्या गाडीचा नंबर दिसेल अशा अंतरापर्यंत ती पाठलाग करते. मग तुमच्या गाडीचा नंबर वाहनांची माहिती देणाऱ्या अॅपमध्ये टाकते. ते अॅप तुमची ओळख त्या टोळीला करून देते. मग ही टोळी तुमच्या जवळ गाडी आणते आणि तुम्हाला तुमच्याच नावाने हाक मारते. आवाज देणारी ती व्यक्ती तुमच्या ओळखीची आहे, असं ते भासवतात. तुम्ही देखील उत्सुकतेपोटी त्याला प्रतिसाद देता, मग ते गाडी बाजूला घ्यायला सांगतात आणि तेव्हा तुम्ही त्यांच्या जाळ्यात अलगत फसलेले असता. ते तुमच्यासह गाडीतील प्रत्येकाला लुटतात आणि तुम्हाला काही कळण्याआधी पसार होतात.
लॉकडाऊनमुळे राज्यातील महामार्ग ओस पडलेत. प्रत्येक मार्गावरून एकावेळी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच वाहनांची ये-जा सुरू असते. याचा फायदा घेऊन काही टोळ्या सक्रिय झाल्यात. यासाठी त्यांनी वरील नवी शक्कल लढवली आहे. वाहनांची माहिती देणारे काही अॅप विकसित झालेले आहेत. यात वाहनाचा नंबर टाकला की गाडी मालकाचे पूर्ण नाव, पत्ता यासह इत्यंभूत माहिती प्राप्त होते. याचाच आधार घेत या टोळ्या प्रवाश्यांना लुबाडत आहेत.
महाराष्ट्र पोलिसांचं आवाहन
लॉकडाऊनमध्ये रस्ते ओस पडलेत. केवळ अत्यावश्यक कारणांसाठी वाहतुकीला मुभा आहे. अशावेळी तुम्ही घाईगडबडीने इच्छित स्थळी पोहचण्याच्या प्रयत्नात असता. तेव्हा ही टोळी तुम्हाला गाठते आणि नावानिशी आवाज देऊन तुम्हाला जाळ्यात अडकवते. तेव्हा प्रवासात तुम्हाला असं आवाज देणाऱ्यांकडे कटाक्षाने दुर्लक्ष करा. ओळखीचा इसम असेल आणि त्याने फोन केला तरच प्रवासात थांबा. पण एखाद्यावर संकट ओढवलं असेल तर मात्र माणुसकीच्या नात्याने त्याच्या मदतीला जा, असं आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आवाहन केलंय.
मोबाईल अॅपचा आधार घेऊन अशी लूट होते. हे ऐकून वाहन मालकांना धक्काच बसतोय. अशा अॅपमुळे गुन्हेगारांना वाहन मालकांची इत्यंभूत माहिती मिळत असेल तर गुन्हेगार त्याचा वापर कधी ही आणि कुठं ही करू शकतात. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याला एखाद्याने विरोध केला तर हत्या ही करू शकतो. गाडीत महिला असेल तर त्याच्या वाईट भावना ही जाग्या होऊ शकतात. त्यामुळे असे अॅप बंद करण्याची मागणी वाहन मालक उमाशंकर यांनी केली. एका क्लिकवर आपल्याला इत्यंभूत माहिती देणाऱ्या अनेक अॅपची निर्मिती होते. ते अॅप आपल्याला हवेहवेसे वाटतात पण असे अॅप जे सामान्यांना धोका निर्माण करतात, त्यावर मात्र कायमची बंदी आणायलाच हवीच.