नितीन गडकरींच्या घरी पाच नातवंडांचा पंचरत्न बाप्पाचे आगमन; आजोबा-आजींची प्रमुख उपस्थिती
गणेशोत्सवाचे संस्कार कुटुंबातील लहानग्यांना घडावेत, सार्वजनिक गणेशोत्सवाचा छोटा अनुभव त्यांना घरीच मिळावं, यासाठी मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबियांनी अनोखे प्रयत्न केल्याचे बघायला आज मिळाले आहे.
Ganeshostav 2024 नागपूर : गणेशोत्सवाचे (Ganeshostav 2024) संस्कार कुटुंबातील लहानग्यांना घडावेत, सार्वजनिक गणेशोत्सवाचा छोटा अनुभव त्यांना घरीच मिळावं, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कुटुंबियांनी अनोखे प्रयत्न केल्याचे बघायला आज मिळाले आहे. चिमुकल्यांच्या आग्रह नंतर आजोबा नितीन गडकरी यांनी घरी लहानग्यांच्या पंचरत्न बाप्पांची वेगळी परवानगी दिली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांच्या घरी गणरायाचे आगमन होते. दरम्यान, गणेशोत्सवाचे संस्कार न कळतच घरच्या चिमुकल्यांवर घडत जातात. मात्र, सार्वजनिक गणपती कसा बसवावं, त्यासाठी काय काय करावे, वर्गणी कशी गोळा करावी, इतर व्यवस्था कशा कराव्यात याचे संस्कार ही चिमुकल्यांना घडणे आवश्यक असतात. त्याचा अनुभवही चिमुकल्यांना मिळणं आवश्यक असतं आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबीयांनी वेगळीच शक्कल लढवली आहे.
पाच चिमुकल्या भावंडांनी एकत्रित येऊन "पंचरत्न गणपती" ची स्थापना
गडकरी कुटुंबात घरगुती गणपतीची स्थापना अनेक वर्षांपासून होत आहे. यंदाही ती स्थापना झाली आहे. मात्र, नितीन गडकरींच्या घरी पाच चिमुकल्या भावंडांनी एकत्रित येऊन "पंचरत्न गणपती" ची स्थापना केली आहे. घरच्या वरच्या मजल्यावर एका मोकळ्या खोलीत चिमुकल्यांचे पंचरत्न गणपती विराजमान झाले आहेत. पाचही भावंडांनी एकत्रित येत त्यासाठी वर्गणी गोळा केली, बाजारात जाऊन मूर्ती पसंत केली. आवश्यक साफसफाई करत सजावटही केली आणि आज चिमुकल्यांचे बाप्पा विराजमान झाले आहे. विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या या गणेशोत्सवात त्यांचे आजोबा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या घरी नातवंडांनी वरच्या मजल्यावर स्थापित केलेल्या बाप्पांच्या आरतीत सहभागी झाले आणि दर्शन घेतलंय.
गणेश हे आपल्या विद्येचे दैवत आहे. आपले ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपली मोठी शक्ती आहे. येणाऱ्या काळात आपण विश्वगुरू बनणार आहोत. तिसरी जगातील आर्थिक व्यवस्था बनणार आहोत. या सर्वांचा संबंध ज्ञानाशी आहे. त्याकरता भगवान गणेशजी आपल्याला आशीर्वाद देतील. सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होवो आणि सुख, समृद्धी आणि संपन्नता मिळो, हीच गणराया चरणी प्रार्थना केली. अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
गडकरींच्या नातवंडांनी साकारला इस्रोचा देखावा
इस्रोचे जसे स्टेशन आहे, तसाच स्टेशनचा देखावा नातवंडांनी बनवला. त्याच्याकरता बाजारातून सामान आणलं. त्यांना विज्ञानाबद्दलची जिज्ञासा आहे. त्याला मी समर्थन दिले. एवढ्या लहान वयात त्यांनी एक कल्पना राबवली हे कौतुकास्पद आहे. आम्हाला तर त्यांच्या वयात हे सुचतही नव्हते.अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.