Gajanan Maharaj : शेगावात गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यावर कोरोनाचे सावट, पहिल्यांदाच भक्तांविना सोहळा
विदर्भाची पंढरी शेगावात यावर्षीच्या श्री संत गजानन महाराजांच्या 143 वा प्रगटदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
बुलडाणा : विदर्भाची पंढरी शेगावात यावर्षीच्या श्री संत गजानन महाराजांच्या 143 वा प्रगटदिनोत्सवात भाविकांना सहभागी होता येणार नाही. सध्या बुलडाणा जिल्ह्यात कोरोना आपले पाय पसरवीत असल्याने जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी जिल्ह्यात धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदाचा 143 वा प्रगटदिन उत्सव मंदिरात अंतर्गत कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
श्रींचा प्रगटदिन उत्सव दरवर्षी श्री संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमासह लाखो भाविक भक्तांच्या व वारकऱ्यांचे उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. मागील वर्षापासून आतापर्यंत कोरोनाचे संकट पसरले असल्याने, तसेच कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाचे निर्देशानुसार प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देशीत असल्याने आज असलेला श्रींचा 143 वा श्री प्रगटदिनोत्सव यावर्षी सालाबादाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार नाही. उत्सवातील कार्यक्रम धार्मिक प्रथा-परंपरेनुसार मोजक्या उपस्थितीत अंतर्गतच संपन्न होतील. अशी माहिती श्री गजानन महाराज संस्थानकडून देण्यात आली आहे.
श्रीसंत गजानन महाराज हे 143 वर्षापूर्वी संतनगरी शेगाव येथे प्रकट झाले होते. त्याठिकाणी त्यांनी आपले जीवन शेगाववासियांच्या सहवासात घालविले. दरम्यान त्यांनी मोठा भाविक वर्ग निर्माण केला होता आणि येथेच ते समाधिस्त झाले. दरवर्षी टाळ मृदुंगाच्या निनादात 'गण गण गणात बोते'चे नामस्मरण करत श्री गजानन या सोहळ्यासाठी हजारो पायी दिंड्या-पालख्या शेगावात दाखल होत असतात . शेगाव संस्थानच्या वतीने या सर्व दिंडी आणि पालख्यांसाठी विविध सोई-सुविधाही देखील पुरवल्या जातात. राज्यभरातून हजारो भाविक या प्रगक दिन सोहळ्यासाठी शेगाव येथे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात. परंतु हा सोहळा देखील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
'