(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गडचिरोलीत 250 बॅग बनावट खत जप्त, शासनमान्य ग्रेड 18:18:10 ची नक्कल करून 'कृषी उदय' नावाने विक्री
नांदेड येथील व्यंकटेश कृषी भांडारचे संचालक या अनिल बालाप्रसाद मंत्री यांच्या विरुद्ध पोलिसांनी कलम 420 व जीवन आवश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड : नांदेड येथील व्यंकटेश कृषी भांडारचं दहा ट्रक बनावट खत गडचिरोलीत जप्त करण्यात आलं आहे. शासनमान्य ग्रेड 18:18:10 ची नक्कल करून 'कृषी उदय' या नावाने विनापरवाना बनावट खताची विक्री केली जात होती. या प्रकरणी नांदेड येथील मे. व्यंकटेश कृषी भांडारच्या संचालका विरुद्ध चामोर्शी पोलिसांनी 250 बॅग खत जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
कृषी विभागाच्या प्राप्त माहितीनुसार व्यंकटेश कृषी भांडारने शासनमान्य ग्रेडच्या रासायनिक खताचा बनावट ब्रँड तयार करून तो गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्रीसाठी पाठवला. चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा येथील काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून एकत्रितपणे 250 बॅग खत मागवले. परंतु खत पाहिल्यानंतर शेतकऱ्यांनी खताच्या गुणवत्ते विषयी शंका व्यक्त केली. त्यानुसार गुण नियंत्रण अधिकारी संजय मेश्राम यांनी खताचे नमुने अमरावतीच्या रासायनिक खत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले.
तपासणी अहवालात "कृषी उदय" कंपनीचे ते खत बोगस असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मेश्राम यांनी त्या बाबतची तक्रार पोलिसात देऊन 250 खत जप्त करण्यात आले आहे. त्यानुसार नांदेड येथील व्यंकटेश कृषी भांडारचे संचालक या अनिल बालाप्रसाद मंत्री यांच्या विरुद्ध पोलिसांनी कलम 420 व जीवन आवश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु जी कारवाई 800 किमीवर असणाऱ्या अमरावती कृषी विभागाने व्यंकटेश कृषी भांडारवर केली तशीच कार्यवाही हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेड कृषी अधिकारी कार्यालयाने का केली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. त्याच प्रमाणे कृषी अधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच असतानाही कृषी विभागास बोगस खत विक्रीची माहिती कशी नाही मिळाली? या बद्दलही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.