हिंदू मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करा आणि हिंदूंना सोपवा; तिरुपती बालाजी मंदिर प्रकरणावरून विश्व हिंदू परिषदेची मागणी
Vishva Hindu Parishad : आम्ही केलेली मागणी संदर्भात सरकारने निर्णय घेतलेला नाही, त्याचेच विपरीत परिणाम तिरुपतीमध्ये दिसून आल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले आहे.
VHP on Tirupati Laddu Controversy : विश्व हिंदू परिषदेने चार वर्षा आधी प्रस्ताव पारित करत सरकारी नियंत्रणातील सर्व मंदिरे भाविक आणि हिंदू धर्म यांच्याकडून संचालित ट्रस्टला द्यावे, अशी मागणी केली होती. त्या मागणी संदर्भात सरकारने निर्णय घेतलेला नाही, त्याचेच विपरीत परिणाम तिरुपतीमध्ये दिसून आल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे (Vishva Hindu Parishad) महाराष्ट्र व गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले आहे. तिरुपती मंदिर सरकारी नियंत्रणात असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेप तिथे होता आणि लाभाच्या उद्दिष्टाने कंत्राटदाराने प्रसादात भेसळ केली. त्यामुळे आमची मागणी आहे की सरकारी नियंत्रणातील सर्व मंदीरे भाविकांकडून संचालित ट्रस्टला देण्यात यावे, अन्यथा तिरुपती सारखी गडबड इतर मंदिरात होऊ शकते, असेही गोविंद शेंडे यावेळी म्हणाले.
तिरुपती सारखी गडबड इतर मंदिरात होऊ नये, भाविकांच्या भावनेशी खेळ होऊ नये, यासाठी हिंदू मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावे आणि हिंदूंना सोपवावी, अशी आमची पुन्हा मागणी असल्याचे ही ते म्हणाले. येणाऱ्या दिवसात ही मागणी पूर्ण झाली नाही तर विश्व हिंदू परिषद राज्यात आणि देशात मोठे आंदोलन उभे करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शेख सुभान अली कोणते पुस्तक वाचून शिवचरित्रकार झाले?- गोविंद शेंडे
कथित शिवचरित्रकार शेख सुभान अली यांचे वक्तव्य सर्व शिवभक्तांचा अपमान करणारे आहे. शेख सुभान अली यांनी त्यांच्या चुकीच्या वक्तव्या संदर्भात सर्व शिवभक्तांची माफी मागावी आणि पुन्हा असे वक्तव्य करू नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. शेख सुभान अली कोणते पुस्तक वाचून शिवचरित्रकार झाले, हे आम्हाला माहित नाही, त्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचावा, असा सल्ला विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी दिला आहे. शेख सुभान अली यांनी शिवभक्तांची माफी मागावी, अशी मागणी गोविंद शेंडे यांनी केली आहे.
ती स्वराज्याची लढाई होती : संजय गायकवाड
तर यावर बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात अनेक मुस्लीम होते. पण शिवाजी महाराजांनी कधीही त्यांना मुस्लीम धर्मीय म्हणून ठेवलं नाही ती स्वराज्याची लढाई होती. हे खरं आहे की, त्याकाळी मनुवादी प्रवृत्तीला विचारल्याशिवाय समुद्रात प्रवेश करता येत नव्हता. मात्र शिवाजी महाराजांनी सगळे निर्बंध धुडकावून समुद्रात प्रवेश केला. त्यांच्यासोबत काही प्रमाणात मुस्लीम मावळे देखील होते. पण 100 टक्के मुस्लीम होते, असं नाही. याकुत बाबांना छत्रपती शिवाजी महाराज मानायचे. त्यामुळेच त्यांना त्याकाळी शिवाजी महाराजांनी मोठी जमीन देखील दिली हे खरे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या