विवाहसोहळा आटोपून परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला; 4 जण जागीच ठार
गंगाखेड-परळी रस्त्यावर भीषण अपघातात चारजण जागीच ठार.टिप्पर-ऑटो अपघातात अंबाजोगाईच्या 4 जणांनी गमावला जीव.

परभणी : गंगाखेड-परळी रोडवर असलेल्या करम पाटी जवळील जिनिंगसमोर झालेल्या हायवा व ऑटोच्या अपघातात ऑटोतील चौघे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातात ठार झालेले चारही तरुण हे अंबाजोगाई येथील आहेत.
सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी येथील विवाहसोहळा आटोपून गंगाखेड परळी रस्त्याने परत परळीमार्गे अंबाजोगाईकडे निघालेल्या रियर ऑटो (क्रमांक एम.एच.23 टी.आर. 311) ला परळीकडून राख घेऊन गंगाखेडकडे येत असलेल्या हायवा (क्रमांक एम.एच.22 ए. एन.5121) ने समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात ऑटोचा चुराडा होऊन ऑटोतील विशाल बागवाले (वय 20), दत्ता भागवत सोळंके (वय 25), आकाश चौधरी (वय 23) आणि ऑटो चालक मुकुंद मस्के (वय 22) सर्व रा. अंबाजोगाई है चार तरुण जागीच ठार झाले आहेत.
अपघाताची माहिती समजताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे स.पो.नि. श्रीनिवास भिकाने, स.पो. उपनिरिक्षक देवराव मुंढे, पांडुरंग काळे, गणेश नाटकर, गोपाळ खंदारे, गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, स.पो.नि.राजेश राठोड, स.पो.उपनिरिक्षक टी.टी. शिंदे, पोलीस शिपाई चंद्रशेखर कावळे, सुग्रीव सावंत, कृष्णा तंबूड, होमगार्ड एस.जी. क्षिरसागर, रात्र गस्तीवर असलेले स.पो.उपनिरिक्षक दिलीप अवचार, निवृत्ती मुंढे, पोलीस शिपाई जयराम दुधाटे, केशव मुंढे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. हायवा खाली सापडून चुराडा झालेला ऑटो व त्यात अडकलेल्या मयतांचे मृतदेह करम, निळा, वडगाव स्टेशन येथील ग्रामस्थ व अन्य लोकांच्या मदतीने रात्री 9.30 वाजता बाहेर काढून गंगाखेड येथील खाजगी रुग्णवाहिकेतून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविले. हायवा चालक फरार झाल्याने हायवा खाली सापडलेला ऑटो व त्यातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीसांना व ग्रामस्थांना अथक परिश्रम करावे लागले.
इतर महत्वाच्या बातम्या :
गेवराईजवळ भीषण अपघात, 'वंचित'च्या लातूर जिल्हाध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचा मृत्यू
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या





















