राज्यात प्रथमच होणार महिलांच्या विषयांसाठी ग्रामसभा, राज्य महिला आयोगाचा पुढाकार, ग्रामपंचायतीमध्ये होणार ठराव
जागतिक महिला दिनाचे (International Women Day) औचित्य साधत उद्या दिनांक 8 मार्च 2025 रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayat) विशेष ग्राम सभा आयोजीत करण्यात येणार आहेत.
मुंबई : जागतिक महिला दिनाचे (International Women Day) औचित्य साधत उद्या दिनांक 8 मार्च 2025 रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayat) विशेष ग्राम सभा आयोजीत करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संपल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचे ठराव या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने केलेल्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश 6 मार्च 2025 रोजीच्या पत्रान्वये दिले आहेत.
नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
याबाबत बोलताना महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर म्हणाल्या की, पुरोगामी व प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत आहेत. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतानाही, विधवा महिलांना रुढी व अंधश्रद्धेमुळे जाचक प्रथांना सामोरे जावे लागते आहे. या सोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक स्तरावर जनजागृती व्हावी यासाठी विशेष ग्रामसभा बोलावून गावात बालविवाह होउ न देणे, पतीच्या निधनानंतर महिलांना जाचक असणार्या प्रथा बंद करणे, गावात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न करणे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे असे ठराव करण्यात यावे अशी आयोगाची संकल्पना आहे. संपुर्ण गावात असे ठराव शासकीय पातळीवर झाल्यास जनसामान्यांच्या मनात महिलांना सन्मानाने वागवणे ही कर्तव्य भावना रुजवता येईल. महिलांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही अशा प्रयत्नांतून बदलेल म्हणून आयोगाने ही संकल्पना मांडल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात पहिल्यांदाच महिलांच्या विषयांकरिता विशेष ग्रामसभा
विशेष ग्रामसभा आयोजित करण्यास निर्देश दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आभार मानले आहेत. राज्यात पहिल्यांदाच महिलांच्या विषयांकरिता विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाल्याने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा मैलाचा दगड असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य महिला आयोगाने दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी याबाबत कार्यवाही करण्याकरिता ग्रामविकास विभागाला पत्राद्वारे कळविले होते. तसेच केंद्र शासनाच्या पंचायती राज विभागाच्या अप्पर सचिवांनी देशातील सर्व राज्यातील ग्रामविकास सचिवांना दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्रान्वये जागतिक महिला दिनानिमित्त महिला सभा आयोजित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Hingoli : अत्याचार प्रकरणी माजी भाजप नगराध्यक्षांना अटक करा; राज्य महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
