Flower Market: महालक्ष्मी गणपतीसाठी फुलबाजारात तेजी, झेंडूसह फुलांना किलोमागे किती रुपये द्यावे लागताहेत?
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसानं फुलबाजाराला फटका बसला असून उत्पादन खराब झाले आहे.
Flower MArket: गणपती बाप्पापाठोपाठ आता महालक्ष्म्यांच्या आगमनासाठी घरोघरी उत्साहात तयारी सुरु आहे. राज्यात महालक्ष्म्यांच्या स्वागतासाठी बाजारपेठांमध्ये रेलचेल वाढली आहे. फुलांची बाजारपेठ झेंडूच्या फुलांसह गुलाब, निशीगंध, शेवंती अशा कितीतरी फुलांनी सजला आहे. गणेशोत्सव आणि महालक्ष्म्यांमुळे सध्या फुलांचा बाजार तेजीत असून छत्रपती संभाजीनगरच्या फुलबाजारात झेंडूला किलोमागे साधारण २०० ते २५० रुपये मोजावे लागत आहेत.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसानं फुलबाजाराला फटका बसला असून उत्पादन खराब झाले आहे. फुलांची आवक घटली आहे. मात्र, मागणी प्रचंड असल्यानं यंदा फुलांसाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये केवडा, लाल फुलांसह झेंडूही महागला आहे.
अतिवृष्टीनं झेंडूची आवक घटली...
यंदा राज्यात झालेल्या पावसाने अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी जाहीर झाली असून हजारो हेक्टर पिकाचे नुकसान झाले. गणेशोत्सवासह महालक्ष्म्याना फुलांना मोठी मागणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी झेंडूसह, जरबेरा, गुलाब अशा फुलांचे उत्पादन घेतले होते. अतिवृष्टीने सर्व फुलझाडे खराब झाली असून ऐन सणात फुले खराब झाल्याने शेतकरी हताश आहेत.
झेंडू महागला, किलोमागे २५० रुपये!
छत्रपती संभाजीनगरच्या फुलबाजारात फुलांच्या माळा १००० रुपयांच्या घरात गेल्या असून छोट्या माळा ६०० ते ७०० रुपयाला मिळत आहेत. झेंडू फुलांना अधिक मागणी असल्यानं यंदा बाजारात झेंडूचे दर २०० पार झाल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी २०० ते २५० रुपये किलो असा भाव सुरु आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यातही फुले महागली आहेत. निशिगंधही महागला असून एका काडीमागे साधारण ७० ते ८० रुपये द्यावे लागत असल्याचं ग्राहकांनी सांगितलं.
महाराष्ट्रात फुल उत्पादन ३३५६ हेक्टरात
भारतात सर्वाधिक फुलउत्पादन घेणाऱ्या राज्यांपैकी महाराष्ट्रही एक आहे. महाराष्ट्रात साधारण ३३५६ हेक्टर क्षेत्रावर फुलांचं उत्पादन घेतलं जातं. कार्नेशन आणि जरबेरा यांसारख्या कापलेल्या फुलांच्या पिकांना देशात चांगली बाजारपेठ मिळत आहे.