वसईत पाच कोटीची वीज चोरी उघड, पाच जणांविरोधात गुन्हा
एकीकडे कोळसा टंचाईने महाराष्ट्रावर वीज टंचाईची टांगती तलवार लटकत असताना, मोठं मोठे कारखानदार कशा प्रकारे वीज चोरी करत आहेत, याची प्रचिती विरारमध्ये समोर आली आहे.
वसई-विरार : विरारच्या एका कारखान्यात पाच कोटीची वीज चोरी महावितरणाने उघड केली आहे. बर्फ बनविणा-या या फॅक्टरीमध्ये ही विज चोरी मागील पाच वर्षापासून सुरु होती. रिमोर्टद्वारे वीज वापरावर नियंञण करणारं सर्किट बसवून, ही वीज चोरी केली जात होती. याप्रकरणी महाविरणाने विरार पोलीस ठाण्यात कारखान्याच्या चार मालकांवर तसेच वीज चोरीची यंञणा बसवणा-याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एकीकडे कोळसा टंचाईने महाराष्ट्रावर वीज टंचाईची टांगती तलवार लटकत असताना, मोठं मोठे कारखानदार कशा प्रकारे वीज चोरी करत आहेत, याची प्रचिती विरारमध्ये समोर आली आहे. विरारच्या माजिवली येथील डायमंड आईस फॅक्टरीमध्ये 30 ऑक्टोंबर 2021 ला महावितरणाच्या पथकाने धाड टाकून, मीटरकडे जाणा-या तिन्ही सिटीमधील प्रत्येक फेजच्या वायरिंगमध्ये सर्किट जोडून, ते रिमोटच्या साहाय्यानं नियंञित करुन, कारखान्याच्या एकूण वीज वापराची मीटरमध्ये कमी नोंद होईल अशी व्यवस्था केली असल्याचं उजेडात आलं. या कारखान्यात बर्फ बनवण्याच काम होतं. नोव्हेंबर 2016 पासून ऑक्टोंबर 2021 पर्यंत जवळपास पाच वर्ष ही वीज चोरी हा कारखानदार करत होता. एकणू 27 लाख 48 हजार 364 युनिटची चोरी केल्याच महावितरणाच्या लक्षात आलं. त्याची एकूण किंमत चार कोटी 93 लाख 98 हजार एवढी आहे.
महाराष्ट्र विद्युत महावितरणाने या चोरी प्रकरणी कारखान्याचे चार संचालक मन्सूरभाई वालजीभाई कानान, शहाबुद्दीन अब्बास समनानी, बदरुद्दीन नानजी ओलचिया, निजार नानजी ओलचिया आणि विजचोरीची यंञणा बसवणा-या एका अज्ञात व्यक्तिविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. विरार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. आतापर्यंत कुणालाही अटक केलेली नसून, या प्रकरणाचा तपास करत आहेत.