एक्स्प्लोर
बाळाची गळणारी लाळ थांबवण्यासाठी फिरवलेला जिवंत मासा अन्ननलिकेत अडकला
बारामतीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा, सौरभ मुथा, कान, नाक घसा तज्ज्ञ डॉ. वैभव मदने आणि भूलतज्ज्ञ अमरसिंह पवार यांच्या पथकाने किमया केली आणि ऊसतोड मजुराच्या चिमुकल्या मुलीचा जीव अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला
बारामती : तोंडातून गळणारी लाळ बंद होण्यासाठी जिवंत मासा तोंडातून फिरवण्याचा मावशीने केलेला अघोरी उपाय बारामतीतील चिमुकलीच्या अंगलट आला आहे. घरगुती उपचाराबाबत अर्धवट माहितीतून महिलेने पाच महिन्यांच्या चिमुकलीच्या तोंडात जिवंत मासा फिरवला. मात्र गुळगुळीतपणामुळे मासा निसटून थेट बाळाच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला आणि चिमुकलीची आयुष्याशी लढाई सुरु झाली. बारामतीतील किमयागार डॉक्टरांनी अथक प्रयत्नांनी बालिकेचे प्राण वाचवले.
पाच महिन्यांची मुलगी तोंडातून लाळ गाळते, जर जिवंत मासा तोंडातून फिरवला तर लाळ गाळायचे बंद होईल, अशी घरगुती उपचाराची अर्धवट माहिती असलेल्या मावशीने चिमुकलीच्या तोंडात जिवंत मासा फिरवला. शिर्सूफळहून बारामतीला आणेपर्यंत बाळाचा श्वास काही वेळा बंद झाला, पण बारामतीतील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करुन तिला संजीवनी दिली.
बारामतीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा, सौरभ मुथा, कान, नाक घसा तज्ज्ञ डॉ. वैभव मदने आणि भूलतज्ज्ञ अमरसिंह पवार यांच्या पथकाने ही किमया केली. डॉक्टरांनी दाखवलेली तत्परता, प्रसंगावधान आणि अत्यंत युद्धपातळीवर केलेल्या शस्त्रक्रियेमुळे ऊसतोड मजुराच्या चिमुकल्या मुलीचा जीव अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आलाय
मूळच्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील बापू माळीचे कुटुंब कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी बारामती तालुक्यातील शिर्सूफळमध्ये आले होते. बापू यांची पाच महिन्यांची मुलगी अनू ही जन्मल्यापासून तोंडातून लाळ गाळते, म्हणून अर्धवट माहिती असलेल्या तिच्या मावशीने पाण्याच्या पाटचारीत मासा शोधला. बोटाच्या आकाराचा जिवंत मासा आणून तिने तो लहानग्या अनुच्या तोंडातून फिरवायचा प्रयत्न केला, मात्र मासा बुळबुळीत असल्याने तो निसटून अनूच्या थेट अन्ननलिकेतून श्वासनलिकेपर्यंत गेला आणि तिचा जीव घुसमटला. हे पाहताच बापू माळीने लेकीला घेऊन दुचाकीवरुन बारामती गाठलं
बारामतीतील डॉ. मुथा यांच्या दवाखान्यात धावतच चिमुकल्या अनुला आणण्यात आलं. मात्र तोपर्यंत तिचा श्वास बंद झाला होता. डॉ. राजेंद्र मुथा, सौरभ मुथा यांनी तिच्या छातीवर जीवन संजीवनी (सीपीआर) क्रिया करण्याचा प्रयत्न करत हृदय पुन्हा चालू करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि त्यानंतर लागलीच तिच्यावर दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करुन मासा बाहेर काढण्यात आला.
दहा मिनिटे चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर बाळाचा श्वास व्यवस्थित सुरु झाला. तिला येणारे झटके कमी होण्याची इंजेक्शन देऊन तिची प्रकृती स्थिर करण्यात आली आणि डॉक्टरांनी सुटकेचा श्वास टाकला. डॉक्टरांनी कमी कालावधीत चिमुकलीचे प्राण वाचवल्याची माहिती परिचारिकांनी बाहेर येऊन सांगताच उपस्थित सर्वांनीच टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी नागपुरात तोंडात फुगा गेल्यामुळे एकाचा, तर केळ्याचा मोठा घास घेतल्यामुळे एका चिमुरडीचा मृत्यू झाला होता. तर लॉलीपापचा गोळा अडकल्याने लहानग्या मुलाचा जीवही धोक्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
जळगाव
करमणूक
Advertisement