(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशातलं पहिलं वृक्ष संमेनल बीडमध्ये, सयाजी शिंदेंच्या पुढाकाराने माळरानावर फुललं नंदनवन
वृक्ष संमेलन भरलेलं कधी पाहिलं आहे का? नसेल पाहिलं, तर आता ते पाहायला मिळणार आहे. लवकरच बीडमध्ये असे वृक्ष संमेलन भरणार आहे.
बीड : आजपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारची संमेलनं पाहिली आहेत. साहित्य, नाट्य, शिक्षक व कर्मचारी यांची संमेलनं भरतात. परंतु कोणी वृक्ष संमेलन भरलेलं कधी पाहिलं आहे का? नसेल पाहिलं, तर आता ते पाहायला मिळणार आहे. लवकरच बीडमध्ये असे वृक्ष संमेलन भरणार आहे. हे वृक्ष संमेलन केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहिले वृक्ष संमेलन असणार आहे. या संमेलनासाठी सह्याद्री देवराईचे प्रणेते आणि अभिनेते सयाजी शिंदे दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.
बीड शहराजवळच्या पालवन परिसरात देशातल्या पहिल्या वृक्ष संमेलनाची तयारी सुरु आहे. इथल्या प्रत्येक हालचालीवर सयाजी शिंदे हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सयाजींनी तीन वर्षापूर्वी याच पालवनच्या उजाड माळरानावर चिल्यापिल्यांना सोबत घेऊन हजारो वृक्षांची लागवड केली. ती रोपटी आता मोठे वृक्ष बनून मानाने डोलत आहेत. याच वृक्षांच्या पायथ्याशी राज्यातील हजारो वृक्षमित्र जमणार आहेत
वृक्षसंमेलनाबाबत बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, या उजाड डोंगरावर हजारो झाडांची लागवड केली खरी मात्र ती जोपासणं तेवढच अवघड होतं. त्यामुळे सायाजी शिंदे सतत्याने या भागात येऊन या झाडांची पाहणी करतात. वन विभाग आणि बीडकरांच्या मदतीने उन्हाळ्यात या झाडांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आणि आता ही सह्याद्री देवराई नावारुपाला आली आहे. हिरवळीने नटलेला हा डोंगर पाहण्यासाठी आता गर्दी होत आहे. सातारा आणि बीड नंतर आता हा प्रयोग लातूर-परभणी जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे.
या उजाड आणि उनाड माळावर असे एखादे नंदनवन होऊ शकते, अशी कल्पना लेखक अरविंद जगताप यांच्या डोक्यात आली आणि तिथून या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळू लागलं. या उजाड आणि ओसाड डोंगरावर तीन वर्षापूर्वी केलेला हा प्रयोग आता यशस्वी होताना दिसत आहे. बीडपासून हाकेच्या अंतरावर असलेला पालवनचा हा परिसर आता एक ग्रीन पार्क म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. सकाळी मोकळी आणि ताजी हवा मिळावी, यासाठी बीडकर या सह्याद्री देवराईला पसंती देत आहेत.
पालवनच्या या डोंगरावर फक्त झाडच नाही तर आता या ठिकाणी एक नॅचरल पार्क उभं केलं जात आहे. पार्कसाठी याच डोंगरावर असलेल्या मोठ-मोठ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. पर्यावरणाला पूरक असणार्या वस्तूंचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे आखीव-रेखीव दगड आज जितके आकर्षक वाटत आहे तितकीच याचे ठेवणसुद्धा बघणाऱ्यांना आपलंसं करते.