इतिहासात प्रथमच बेळगावमधील यल्लमा देवीची यात्रा रद्द, मंदिर 31 डिसेंबरपर्यंत बंदच
इतिहासात प्रथमच बेळगावातील सौंदत्ती श्री यल्लमा देवीची यात्रा रद्द झाली आहे. 31 डिसेंबरपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. 30 डिसेंबर रोजी ही यात्रा होणार होती.
बेळगाव : दिवाळी पाडव्याच्या दिवशी संपूर्ण राज्यभरातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. पण सौंदत्ती इथल्या श्री यल्लमा देवीचे मंदिर 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी जारी केला आहे. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशामुळे यावर्षीची श्री यल्लमा देवीची 30 डिसेंबर रोजी होणारी पहिली पौर्णिमा यात्रा रद्द झाली आहे. इतिहासात प्रथमच सौंदत्ती श्री यल्लमा देवीची यात्रा रद्द होण्याचा प्रसंग उद्भवला आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे आराध्य दैवता असलेल्या सौंदत्ती इथलं यल्लमा देवीचे मंदिर गेल्या नऊ महिन्यांपासून बंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी देवीचं मंदिर 30 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेला होणाऱ्या देवीच्या यात्रेला खास करुन कोल्हापूर, सातारा, सांगली या पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांची उपस्थिती असते. यावर्षीही 30 डिसेंबर रोजी देवीच्या यात्रेचा दिवस आहे. प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यातील देवीच्या यात्रेला पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक आणि अन्य ठिकाणाहून लाखो भाविक सौंदत्ती डोंगरावर येत असतात.
जनतेच्या आणि भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत जारी करण्यात आलेल्या प्रशासनाच्या आदेशाला समस्त रेणुका भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानचे कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी केले आहे.
Yellamma Devi Yatra | इतिहासात पहिल्यांदाच बेळगावातील यल्लमा देवीची यात्रा रद्द