Jalgaon: जळगावमध्ये शेतकरी त्रस्त, अज्ञातांकडून केळी बागांचं मोठं नुकसान
Jalgaon: अगोदरच नैसर्गिक संकटांचा सामना करताना अडचणीत सापडलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी (Banana) उत्पादक शेतकरी आता विघ्न संतोषी लोकांच्या केळी कापून फेकण्याचा प्रकाराने चांगलाच त्रस्त झाला आहे.
Jalgaon: अगोदरच नैसर्गिक संकटांचा सामना करताना अडचणीत सापडलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आता विघ्न संतोषी लोकांच्या केळी कापून फेकण्याचा प्रकाराने चांगलाच त्रस्त झाला आहे. मागील काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अनेक ठिकाणी केळी बागा कापून फेकण्याचा प्रकार सातत्याने घडत असल्याचं दिसून आले आहे. पोलिसांनी ही या प्रकरणाची गंभीर दाखल घेत आरोपींना पकडण्यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे. असं असलं तरी अद्यापही या घटना सुरुच असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मागील काही दिवसांपासून रावेर तालुक्यात सावदा आणि चीनावल परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या केळी कापून फेकल्याचा प्रकार घडत आहेत. अशातच रावेर तालुक्यातील कुंभार खेडा भागात अनिल पाटील या शेतकऱ्यांच्या केळी पिकाच अज्ञातांनी मोठं नुकसान केलं आहे. या आरोपींनी त्यांच्या शेतातील केली बागांचं नुकसान करत एक चिट्ठी लिहीत गावातील मजुरांना काम देण्यात यावे असे म्हटले आहे. ही चिठ्ठी म्हणजे शेतकरी आणि पोलिसांना एक प्रकारचे आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकारानंतर स्थानिक राजकारण्यांनी आणि शेतकऱ्यांनी पोलिसांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा रोष पाहता पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक निर्माण करून तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आल्याचं सांगितलं होतं. मत हे पथक स्थापन करून आठ दिवस झाले असले तरी अद्याप पोलिसांना या आरोपींना पकडण्यात यश आलं नाही.
मागील दोन वर्षांपासून शेतीतून उत्पन्न नाही - शेतकरी अनिल पाटील
आपल्या शेतीचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी अनिल पाटील म्हणाले आहेत की, ''मागील दोन वर्षांपासून शेतीतून कोणतंही उत्पन्न आलेले नाही. त्यात कर्ज काढून केली बाग तयार केली होती. मात्र त्यातही विघ्न संतोषी लोकांनी आपली बाग अशी कापून फेकल्याने उपजीविका कशी करायची आणि कर्ज कस फेडायच असा प्रश्न पडला आहे.'' यावेळी भावुक झालेल्या शेतकरी अनिल पाटील यांनी यातून आता काहीच मार्ग दिसत नसल्याने आपल्या पुढे आत्महत्या करणे शिवाय पर्याय शिल्लक नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, सातत्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता आणि त्यांचा रोष पाहता पोलिसांनी तातडीने याची गंभीर दखल घ्यायला हवी. वेळ प्रसंगी मोक्का सारखा कायदा लावावा, तडीपारी करावी, जेल मध्ये टाका. जेणेकरून पुन्हा कोणाची अशा प्रकारचे कृत्य करण्याची हिम्मत होणार नाही असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पोलिसांना सुनावलं आहे