टाटाचे बनावट मीठ, कंपनीने केला पोलिसांच्या मदतीने पर्दाफाश
कारवाईत 182 क्विंटल संशयास्पद मीठ जप्त करण्यात आले आहे. अन्न औषध प्रशासन देखील याचे नमुने संकलित करणार असून त्यात दोष आढळल्यास अन्न भेसळ कायद्यानुसार देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.
जळगाव : तुम्ही खात असलेले मीठ असली आहे का? याचा विचार करण्याची गरज आता वाटू लागली आहे. तुम्ही म्हणाल हे तुम्ही आम्हाला का विचारत आहे. त्याला कारण म्हणजे, टाटा कंपनीच्या नावाने बनावट मिठाची विक्री केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यतील जामनेर येथील एका व्यावसायिकाने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने हा प्रश्न समोर आला आहे.
असली नमक म्हणजे टाटाचं मीठ अशी ज्याची ओळख आहे अशा टाटा कंपनीच्या प्रसिद्ध असलेल्या मिठाच्या नावाने बनावट मीठ विक्री होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. अशा प्रकारच्या बनावट मिठाची विक्री जामनेर शहरात होत असल्याची माहिती टाटा कंपनीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई येथील पथकाने काल रात्री जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे पोलिसांची मदत घेत, जामनेर शहरातील मयूर ट्रेडर्स या दुकानाच्या गोडाऊनमध्ये तपासणी केली. टाटा कंपनीच्या मिठाच्या पिशव्या सारख्या मिळत्या जुळत्या मिठाच्या पिशव्या या ठिकाणी आढळून आल्या होत्या. कंपनी प्रतिनिधीनींनी जामनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मयूर ट्रेडर्सच्या मालकाविरोधात कॉपी राईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
182 क्विंटल संशयास्पद मीठ जप्त करण्यात आले आहे. अन्न औषध प्रशासन देखील याचे नमुने संकलित करणार असून त्यात दोष आढळल्यास अन्न भेसळ कायद्यानुसार देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा पर्यंत जामनेर शहरात ही कारवाई करण्यात आली असल्याने मोठी खळबळ उडाली. मीठ विक्रेत्यांनी आपण खात असलेल्या मिठाशी तरी प्रामाणिक राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टाटा कंपनीसाठी काम करणाऱ्या आय पी इन्व्हेस्टीगेशन डिटेकटर सर्व्हिस प्रा ली या कंपनीला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल रात्री पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. लाखो रुपयांच बनावट मीठ या ठिकाणी जप्त करण्यात आलं आहे. मात्र हे मीठ कोठून येते याचा तपास पोलिसांनी लावला पाहिजे अशी अपेक्षा या कंपनी प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. मागील वर्षीही चाळीसगाव येथे 20 टन बनावट मीठ जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही आता दुसरी कारवाई आहे.