(Source: Poll of Polls)
Fact Check: साईबाबा संस्थानने मशिदीसाठी दिले दान? व्हायरल होणारी बातमी कितपत खरी? वाचा काय आहे सत्य
साईबाबा संस्थानने मशिदसाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल माध्यमात व्हायरल होतोय. यामुळे साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. हा व्हायरल होणारा व्हिडीओची नेमकी सत्यता काय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
शिर्डी : साईबाबा संस्थानने मशिदीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल माध्यमात सध्या व्हायरल होत आहे, साईबाबा संस्थानच्या संबंधित वादग्रस्त आणि संभ्रम निर्माण करणारे मेसेज, व्हिडीओ काही समाज कंटकांकडून सोशल माध्यमांवर पसरवले जात आहेत. मात्र अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन साईबाबा संस्थानसह शिर्डी ग्रामस्थांनी केले आहे. या व्हिडिओ बाबत कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई केली जाणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानाकडून देण्यात आली आहे. एबीपीने फॅक्ट चेक करत ही व्हायरल बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये साईबाबा संस्थानने भाविकांकडून जमा होणारी दानाची रक्कम एका मशिदीसाठी दिल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र साईबाबा संस्थानने असा कुठलाही निधी दिला नसून निधी देण्याची तरतूदच नसल्याचं साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी म्हटलंय. संस्थानकडे जमा होणारी दानाची रक्कम विविध सामाजिक उपक्रमांसाठी खर्च केली जाते आणि या निधीचा विनियोग करताना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते असे देखील तांबे यांनी स्पष्ट केलंय. ग्रामस्थ तथा माजी नगरसेवक रविंद्र गोंदकर म्हणाले, तो व्हिडीओ राज्यातील किंवा देशातील नााही. तो दुबई किंवा परदेशातील व्हिडीओ आहे. साईबाबांचा पैसा साईभक्तांवर, ग्रामस्थांवर,तसेच भोजनालय, शैक्षणिक संस्था, रुग्णालय किंवा आप्तकालीन मदतीसाठी विश्वस्त मंडळाच्या परवानगीने वापरण्यात येतो. साईबाबा संस्थान बदनाम करण्याचे काम एक टीम करत आहे.
अपप्रचार करणाऱ्यांवर कारवाई करावी
शिर्डी ग्रामस्थही आता अशा अप्रचारामुळे आक्रमक झाले असून साईसंस्थानला आणि पर्यायाने शिर्डीला बदनाम करण्याचं हे कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटले. संबधित समाजमाध्यम आणि अपप्रचार करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
सध्या सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल झाल्याने राज्यात अनेक ठिकणी दंगलीच्या घटना घडल्या. या घटनांवरुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांडून करण्यात आला. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन एबीपी माझा करत आहे. सध्या सोशल मीडियावर ठेवण्यात येणाऱ्या स्टेटसमुळे वाद किंवा मारहाण झाल्याचे प्रकार नाहीतर राज्यातून समोर येत आहेत. त्यामुळे यांसारख्या आक्षेपार्ह स्टेटसवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा :