Guardian ministers: अजित पवार गटाच्या एन्ट्रीने पालकमंत्रीपदाचा सुद्धा तिढा वाढला; शिंदे गटाची कोंडी होण्याची शक्यता
अजित पवार गटाचा शपथविधी झाल्यानंतर सुद्धा खातेवाटपावरून शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमध्ये चांगलीच चढाओढ सुरू होती. बऱ्याच कालावधीनंतर खातेवाटप करण्यात आले. असले तरी आता मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.
![Guardian ministers: अजित पवार गटाच्या एन्ट्रीने पालकमंत्रीपदाचा सुद्धा तिढा वाढला; शिंदे गटाची कोंडी होण्याची शक्यता entry of Ajit Pawar group the guardian minister position also increased there is a possibility of a dilemma for the Shinde group Guardian ministers: अजित पवार गटाच्या एन्ट्रीने पालकमंत्रीपदाचा सुद्धा तिढा वाढला; शिंदे गटाची कोंडी होण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/10/8fe3d2859953d6044d9b586ca381ead61691690019514736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Guardian ministers : राज्यात शिंदे फडणवीस सरकारमध्ये फुटीर अजित पवार गट सुद्धा सामिल झाल्याने राज्यातील सत्ता समीकरणे पूर्णतः बदलून गेली आहेत. अजित पवार गटाचा शपथविधी झाल्यानंतर खातेवाटपावरून शिंदे, पवार गट आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू होती. बऱ्याच कालावधीनंतर खातेवाटप करण्यात आले. आता मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपदाचा तिढा सुद्धा चांगलाच वाढत चालला आहे.
अजित पवार गटाकडून कोणत्या जिल्ह्यांवर दावा?
अजित पवार गटाकडून पुणे, नाशिक, कोल्हापूर, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावा करण्यात आल्याने शिंदे गटाची सर्वाधिक कोंडी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या ठिकाणी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्यामुळे तसेच अदिती तटकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट रोजी कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यामध्ये झेंडावंदन करतील याबाबत राज्य सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. 28 मंत्री 28 जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करणार असून सात जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
अजित पवार गटातील मंत्री कोणत्या जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करतील?
उपमुख्यमंत्री अजित पवार (कोल्हापूर), छगन भुजबळ (अमरावती), दिलीप वळसे पाटील (वाशिम), हसन मुश्रीफ (सोलापूर), धनंजय मुंडे (बीड), धर्मराव आत्राम (गडचिरोली), संजय बनसोडे (लातूर), अनिल पाटील (बुलढाणा) आणि अदिती तटकरे यांना पालघरमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. नवीन मंत्र्यांवर तात्पुरती झेंडावंदन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ होत नसल्याने आणि अजित पवार गट सत्तेमध्ये सहभागी झाल्याने शिंदे गटांमध्ये कुरबुरी दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे आता खातेवाटप आणि पालकमंत्रीचा निर्णय झाल्यानंतर शिंदे गटाकडील खात्यांना कात्री लावली जाणार का? याची चर्चा रंगू लागली आहे.
विदर्भात वरचष्मा कोणाचा?
नागपूरमध्ये उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वजारोहण करणार आहेत. गडचिरोलीमध्ये धर्मराव आत्राम करणार आहेत. मात्र, वर्धा, गोंदिया, भंडारा, अकोला या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात हे जिल्हे भाजपकडेच राहतील, अशीच शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेडमध्येही जिल्हाधिकाऱ्यांवर ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. रायगडमध्येही जिल्हाधिकारी करणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्यावरून अजित पवार आणि शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला तगडी खाती मिळाली असल्याने पालकमंत्रीपदातही शिंदे गटालाच कात्री लावली जाणार की भाजपने आणखी उपाशी राहून दोघांना गणित जुळवून देणार? याचे उत्तर मंत्रिमंडळ विस्तारामध्येच मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)