(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Sena : शिवसेनेला आणखी एक झटक्याची शक्यता, आमदारानंतर खासदारही बंडखोरीच्या वाटेवर?
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाची लढाई आता राज्यातून थेट दिल्लीमध्ये पोहोचल्याचं चित्र आहे.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाची लढाई आता राज्यातून थेट दिल्लीमध्ये पोहोचल्याचं चित्र आहे. 40 आमदारांनंतर आता खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 20 जूनला विधानपरिषद निवडणुक पार पडल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. सत्तेत असलेल्या शिवेसेनेचे 40 आमदार फुटले, आणि सत्तेतून बाहेर पडले. यानंतर शिवसेनेची न भरून येणारी हानी झाली. मात्र असे असताना आता शिवसेनेचे खासदार ही त्या वाटेवर आहेत अशी जोरदार चर्चा आहे.
शिवसेनेकडे आताच्या घडीला लोकसभेत 18 खासदार आहेत. 2019 ला भाजपपासून फारकत घेतल्यानंतर सातत्याने लोकसभेत शिवसेना खासदारांचा सूर भाजप विरोधीच दिसून येतोय. मात्र शिंदे गट वेगळा झाल्यानंतर आणि भाजप बरोबर सत्तास्थापन केल्यानंतर 10 ते 12 शिवसेना खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शिवसेना खासदारांमधे नाराजीची चर्चा असताना शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान करावे असे म्हटले आहे. तर शिवसेनेने आधीच विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेच्या १०ते १२ खासदारांनी भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केल्याचं बोललं जात आहे. यासोबतच हे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात ही असल्याचंही बोललं जातंय.
किती खासदार शिंदेसोबत चर्चा काय ?
शिंदे गटात येणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांमध्ये पहिले नाव त्यांचे पुत्र कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे आहे. याशिवाय रामटेकमधून रामकृपाल तुमाने, हिंगोलीतून हेमंत पाटील, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, यवतमाळमधून भावना गवळी, दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, बुलढाणामधून प्रतापराव जाधव, पालघरमधून राजेंद्र गावित, नाशिकमधून हेमंत गोडसे, मावळमधून श्रीरंग बारणे यांची आणि ठाण्यातून राजन विचारे यांच्या नावाची चर्चा आहे.
यवतमाळच्या खासदार भावना गवळींनी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. कठीण असला तरी शिवसेनेसाठी निर्णय घ्या, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. एकंदरित भाजपसोबत या हे पत्रात अप्रत्यक्षपणे नमूद केल्याची चर्चा आहे. त्यामुळें गवळी यांच्यासह काही खासदारांनी भाजपसोबत जुवळून घ्या अशी इच्छा उद्धव ठाकरेंसमोर ही व्यक्त केल्याची माहिती आहे. पण, शिवसेनेचा कोणताही नेता किंवा खासदार यावर बोलण्यास तयार नाही.
आता कोण खासदार उद्धव ठाकरे सोबत आहे ?
दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, उत्तर-पश्चिम मुंबईतून गजानन कीर्तिकर, उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर, हातकलंगणेतून धैर्यशील माने, परभणीतून संजय बंडू जाधव, कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि दादरा नगर हवेलीमधून कलाबेन देऊळकर यांचा समावेश आहे.