Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं! 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे'
Eknath Shinde shiv sena Party Name: 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असं शिंदे गटाचं नाव असेल अशी माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. आज संध्याकाळी या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde Party Name: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सत्तासंघर्षात एक पाऊल पुढं टाकलं आहे. आपल्या गटाचं नाव आता त्यांनी ठेवलं असून 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असं शिंदे गटाचं नाव असेल अशी माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. आज संध्याकाळी या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. एबीपी माझाला सूत्रांनी ही एक्स्क्लुझिव्ह माहिती दिली आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी दिली आहे. बाळासाहेबांचं नाव वापरुन सहानुभूती दाखवायची गरज नाही. त्यांना हे नाव वापरण्याचा अधिकार नाही. आम्हाला पक्षप्रमुखांनी आदेश दिले नाहीत म्हणून आम्ही शांत आहोत, अशा भावना शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
आज शिंदे गटाची बैठक
तिकडे गुवाहाटीतल्या रॅडिसन हॉटेलात शिंदे गटाची बैठक सुरु आहे. दुपारी 4 वाजता बंडखोर आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत शिंदे गट कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष लागून आहे. उद्धव ठाकरेंनी काल केलेल्या आरोपांना उत्तर देणार? शिंदे गटाचं पुढचं पाऊल काय? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
राजकीय नाट्याचा पुढील अंक आता अपेक्षेनुसार कोर्टात रंगणार
महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा पुढील अंक आता अपेक्षेनुसार कोर्टात रंगणार असल्याची आता दाट शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिशीविरोधा एकनाथ शिंदे आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी 12 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी चार आमदारांना अशा एकूण 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर गटातील 16 आमदारांना अपात्रेची नोटीस बजावली. त्यानंतर आता शिंदे गटाने या नोटीशीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आहे. त्यामुळे त्यांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला आहे. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर शिंदे गट आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. शिंदे गट आता पक्ष प्रमुख ठाकरे यांना मात देण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut : शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत
Maharashtra Political Crisis Eknath Shinde: शिवसेनेच्या बंडाची लढाई आता कोर्टात; शिंदे गट घेणार सुप्रीम कोर्टात धाव