(Source: Poll of Polls)
Eknath Shinde : आरोग्य विभागातील 1446 वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदस्थापनेचे आदेश, कमी वेळेत प्रक्रिया पूर्ण
Health Department Recruitment : राज्यातील सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या डॉक्टरांना केलं.
मुंबई : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया (Health Department Recruitment) पूर्ण करण्यात आली. गुरूवारी विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते 1446 एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती झाली असून त्यामाध्यमातून राज्यातील सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
अत्यंत कमी दिवसात नियुक्तीपत्र दिलं
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील 1729 रिक्त पदांसाठी एमबीबीएस व बीएएमएस उमेदवारांचे एकूण 29 हजार 556 अर्ज ऑनलाईन पोर्टल द्वारे प्राप्त झाले होते. 6575 एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी अर्ज केले होते. एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन अंतिम गुणवत्ता यादीनुसार 1446 एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यांना आज पदस्थापनेचे आदेश देण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील 1729 रिक्त पदे नामनिर्देशनाने भरण्याबाबत शासनाने 30 जानेवारी 2024 रोजी मान्यता दिली होती. याबाबत 31 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध जाहिरात करण्यात आली होती. पदभरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते.
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 1 ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर छाननी प्रक्रीया पूर्ण करून आज आदेशही देण्यात आले. अत्यंत कमी दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्तीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले.
विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
ही बातमी वाचा: