पोलीस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून खोट्या गुन्ह्याखाली माझ्या अटकेचं षडयंत्र; राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
Eknath Khadse on Girish Mahajan : पोलीस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून खोट्या गुन्ह्याखाली मला अटक करण्याचं षडयंत्र; राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
Eknath Khadse on Girish Mahajan : पोलीस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून खोट्या गुन्ह्याखाली मला अटक करण्याचं षडयंत्र रचलं जातंय, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. जळगाव (Jalgaon) स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या षडयंत्राची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं मला दिल्याचा धक्कादायक गौप्यस्पोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच, यावेळी एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांचा (Girish Mahajan) उल्लेख गुंड असा केला आहे.
जामनेरच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या एका कर्मचाऱ्याच्या माध्यमातून मला अटक करण्याचं षडयंत्र सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं काल (शनिवारी) रात्री दिली आहे. सद्यस्थितीत मी अडसर ठरत आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं विरोधकांकडून सुडाचं राजकारण सुरू आहे. जिल्ह्यात नाथाभाऊ उभा असल्यानं विरोधकांना सहजासहजी कुठल्याही निवडणुका जिंकता येणं शक्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं कारस्थान घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही एकनाथ खडसे म्हणाले. पण यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक प्रयोग तसेच धमक्या मला आल्या आहेत. मात्र त्याचे फिरते मी सामना केला आहे, पण अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण ही निषेधार्य बाब असल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले.
पाहा व्हिडीओ : पोलिसांच्या माध्यामातून खोटा गुन्हा दाखल करून मला अटक करण्याचं षडयंत्र : एकनाथ खडसे
सुरक्षेच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांनी पुन्हा गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावला आहे. गिरीश महाजन यांचे अनेकाशी चांगले संबंध आहेत. रात्री-बेरात्री त्यांना अनेकजण भेटायला येतात एकांतात आणि त्यांची भेट होते, असा टोला लगावला. त्यामुळे कदाचित त्यांनी सुरक्षा नाकारली असेल, असं खडसे म्हणाले. टीव्हीमध्ये दिसण्यासाठी गिरीश महाजन हे कधी मुख्यमंत्र्यांच्या मागे उभे राहतात, तर कधी फडणवीस यांच्या मागे उभे राहतात. मी भाजपमध्ये असताना माझ्या मागे उभे राहायचे अशी सुद्धा टीका खडसेंनी केली आहे. तसेच, खडसेंनी गिरीश महाजनांचा उल्लेख गुंड असाही केला आहे.
...म्हणजे, गिरीश महाजन गुंड आहेत : एकनाथ खडसे
सरकारविरोधात भूमिका घेतल्यामुळे या सरकारनं रात्री अचानक माझं सुरक्षा कवच काढून घेतलंय. मला त्याचं काही विशेष वाटलं नाही. पण रात्री 3 वाजता अचानक बैठक होते. मग सुरक्षा काढण्याचा निर्णय होतो. नाथाभाऊ म्हणजे, एवढा मोठा माणूस आहे की, त्या मोठ्या माणसासाठी एवढं केलं जातं. मग गिरीश महाजन म्हणतात की, नाथाभाऊना आता आवश्यकता नाही. नाथाभाऊ सुस्वभावी आहे. याचा अर्थ गिरीश महाजन गुंड आहेत किंवा त्याप्रवृत्तीचे लोक त्यांच्यासोबत आहेत. मला सुरक्षेची अडचण अजिबात नव्हती. गिरीशभाऊ म्हणाले की, मी माझी सुरक्षा कमी करतो. एकच सुरक्षा ठेवतो. कारण त्यांना सुरक्षेचं कडं अडचणीचं ठरतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
युवकांचा आवाज दाबण्याची असुरी शक्ती तुम्हाला कुठून आली?; विनोद पाटील गिरीश महाजनांवर संतापले