Educational Certificate Scam : टीईटीनंतर राज्यातील सर्वात मोठा घोटाळा! संभाजीनगरचा कृष्णा गिरी 'असा' चालवायचा रॅकेट
Crime News : दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती.
Chhatrapati Sambhaji Nagar: पुणे पोलिसांनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी दहावी नापास मुलांना चक्क पास असल्याचे प्रमाणपत्र वाटप करत होती. यासाठी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सारखी बनावट वेबसाईट देखील तयार करण्यात आली होती. दरम्यान दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रॅकेटचे मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगरचे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन, छत्रपती संभाजी नगर), अल्ताफ शेख रा. परांडा जी.धाराशिव) आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम (रा. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली आहे. तर टीईटीनंतर (TET) राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा समजला जातोय.
कोण आहे कृष्णा गिरी?
पुणे पोलिसांनी बनावट दहावीचे प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. यातील कृष्णा गिरी हा मुख्य आरोपी आहे. गिरी हा छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बिडकीन येथील कृष्णापुरमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वी तो फोटोग्राफरचा व्यवसाय करायचा. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने महाराष्ट्र पब्लिक स्कूल नावाने एक संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना तो पास झाल्याचे प्रमाणपत्र देत होता. बिडकीनपासून काही अंतरावर असलेल्या चितेगावमध्ये त्याने यासाठी एक कार्यालय देखील सुरू केलं होतं. मुलांच्या अॅडमिशनसाठी तो सोशल मीडियावरून प्रचार देखील करायचा. मात्र आता याच कृष्णा गिरीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकत त्याचे कारनामे समोर आणले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील दुसरा आरोपी सय्यद इमरान हा देखील छत्रपती संभाजीनगर येथीलच आहे.
कलर झेरॉक्ससाठी अनेकांकडे मागणी!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा गिरी दहावी प्रमाणपत्राच्या कलर झेरॉक्स करून त्याची बनावट कॉपी बनवायचा. यासाठी त्याने बिडकीन गावातील अनेक कलर झेरॉक्स दुकानावर याच्या प्रत काढून देण्याची मागणी केली होती. पण त्याच्यावर संशय आल्याने अनेक दुकानदारांनी नकार दिला. तर काही दुकानदारांनी कलर झेरॉक्स नसल्याचं सांगत त्याला नकार दिला. त्यामुळे या बनावट प्रमाणपत्रासाठी तो संभाजीनगर शहरातील काही दुकानात प्रिंट काढत असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
टीईटीनंतर राज्यातील सर्वात मोठा घोटाळा
काही दिवसांपूर्वी राज्यात टीईटी घोटाळा मोठ्याप्रमाणात गाजला होता. यात अनेक राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांची नावे देखील समोर आली होती. मात्र दहावीच्या बनावट प्रमाणपत्रचा हा घोटाळा त्यापेक्षाही मोठा असल्याचे बोलले जात आहे. या टोळीने बनावट वेबसाईट बनवून त्याद्वारे 700 जणांना आत्तापर्यंत बनावट प्रमाणपत्र दिल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात आणखी किती लोकांचा समावेश आहे, हे पोलीस तपासानंतर समोर येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI