Nagpur Municipal Corporation : बेहिशेबी मालमत्ता संदर्भात गुन्हा रद्द करा; मनपाच्या माजी आरोग्य अधिकाऱ्यांची हायकोर्टात धाव
नागपूर महानगरपालिकेत वादग्रस्त अधिकारी म्हणून चर्चेत असलेल्या डॉ. गंटावार दांपत्याने बेहिशेबी मालमत्ता संदर्भातील गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.
Nagpur News : नागपूर महानगरपालिकेतील (Nagpur Municipal Corporation) वादग्रस्त अधिकारी म्हणून चर्चेत राहिलेले डॉ. प्रवीण गंटावार यांच्याविरुद्ध अवैध मालमत्ता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधित कायद्यांतर्गत सीताबर्डी पोलिसात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा रद्द करावा यासाठी त्यांनी हायकोर्टात याचिका (Bombay High Court Nagpur Bench) दाखल केली आहे. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. एमडब्लू चांदवानी यांनी सीताबर्डी पोलीस, एसीबी (Anti Corruption Bureau) आणि तक्रारकर्ते रवी मडावी यांना नोटीस जारी करत चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. प्रकाश नायडू, सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील आय. जे. दामले यांनी युक्तिवाद केला. 2020 मध्ये त्यांच्यावर मनपाचे एक विद्यमान आणि एक माजी महापौरांच्या कथित हनी ट्रॅपमुळेही ते चर्चेत आले होते.
मालमत्तेची संपूर्ण माहिती सादर
कॉन्स्टेबल रवी मडावी याने त्याच्या पत्नीला 6 डिसेंबर, 2011 रोजी डॉ. गंटावार यांच्या कोलंबिया रुग्णालय व संशोधक केंद्रात उपचारांसाठी भरती केलं होतं. उपचारानंतर 17 डिसेंबरला डिस्चार्ज देण्यात आला. कॅन्सरच्या उपचारासाठी 1 लाख 51 हजार 800 रुपये आणि औषधाचे 59 हजार 020 रुपयांचं बिल दिलं. यासाठी मडावी यांनी 60 हजार रोख आणि उर्वरीत रक्कमेचे दोन धनादेश दिले. दोन्ही धनादेश बाऊन्स झाले. उर्वरित रक्कम मागितल्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रार केली. सोबतच एसीबीकडेही खोटी तक्रार केली, असे गंटावार यांच्या वकिलाने कोर्टात सांगितले. 2014 ते 2020 पर्यंत चौकशी झाली. परंतु, काहीही अवैध आढळले नाही. यात मालमत्तेशी निगडीत सर्व माहितीही सादर करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मालमत्तेशी संबंधित सर्व माहिती दिल्यानंतर उलट तपासणीही झाली. यात ज्ञात मालमत्तेपेक्षा जास्त आढळली नसल्याचे पुढे आले, असंही त्यांनी नमूद केलं. सुनावणीअंती न्यायालयाने तक्रारकर्ते रवी मडावी यांना नोटीस जारी करत चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
राजकीय आरोपही थंडावले
नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या तत्कालिन महापौरांनी अनेक आरोप केले होते. तसेच विविध प्रकारचे दावेही करण्यात आले होते. तसेच तपास यंत्रणांनी कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र सध्या मनपामध्ये प्रशासक असल्याने आणि पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने डॉ. गंटावार दाम्पत्याची होणारे राजकीय आरोपही थंडावले आहे.
ही बातमी देखील वाचा