Dr. Anil Avchat Passed Away : डॉक्टर, पत्रकार, साहित्यिक; कोणती ओळख जास्त भावते; यावर काय म्हटले होते अनिल अवचट?
Dr. Anil Avchat Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं असून वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
Dr. Anil Avchat Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारामुळे वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अनिल अवचट हे पेशानं पत्रकार आणि लेखक, आपली लेखणी त्यांनी कायमच सामान्य जनतेच्या हितासाठी वापरली. 1969 साली त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्यानंतर विविध विषयांवरची त्यांची 22 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. दलित भटक्या जमाती, वेश्या यांच्याबद्दल त्यांनी विपुल लिखाण केलेलं आहे. पुण्यातल्या मुक्तांगण व्यवसनमुक्ती केंद्राचे ते संचालक होते. त्यांनी शोधून काढलेली व्यसनमुक्तीची अनोखी पद्धत जगभरातल्या अनेक केंद्रांमध्ये वापरली जाते. त्यांच्या जाण्यानं एक संवेदनशील आणि बहुआयामी व्यक्तीमत्व हरपल्याची हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. अनिल अवचट यांनी एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम माझा कट्टावर बातचित केली होती. त्यावेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला होता. माझा कट्टा कार्यक्रमात डॉ. अवचट यांना लेखक, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अशा तुमच्या अनेक ओळखी असताना त्यापैकी कोणती ओळख त्यांना जास्त भावते, असं विचारल्यानंतर डॉक्टर म्हणाले होते की, येणाऱ्या पिढीनं मला एक चांगला माणूस म्हणून ओळखावं. त्यांच्या या उत्तरातच त्यांचा नि:स्वार्थीपणा दिसून येतो. साहित्यिक, डॉक्टर, समाजासाठी झटणारा कार्यकर्ता आणि पत्रकार असणाऱ्या डॉ. अनिल अवचट यांनी महाराष्ट्राचं नाव आणखी उंचावली आहे.
माझा कट्टामध्ये बोलताना डॉ. अवचट यांनी व्यक्त केली होती खंत
आपल्या बालपणाबद्दल सांगताना त्यांनी एक खंत व्यक्त केली होती, ती म्हणजे त्यांच्या बालपणी ग्रंथालयं नव्हती. काही वाचायचं झालं तर ते साहित्य सहजरित्या उपलब्ध होत नसे. आताच्या युगातील लहानग्यांकडे वाचनाची साधनं असून देखील त्यांना वाचनात रस नाही. सतत मोबाईलमध्ये गुंतलेल्या, गेमिंगमध्ये समोर दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शत्रू समजणाऱ्या या तरुणपिढीचं नवल वाटतं, असंही ते म्हणाले होते.
पाहा व्हिडीओ : डॉ. अनिल अवचट यांचा संग्रहित 'माझा कट्टा'
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा जन्म
डॉ. अनिल अवचट यांचं लिखाण प्रभावी आहेच, मात्र त्यांचं समाजकार्यही तितकंच उल्लेखनीय आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची एक अनोखी पद्धत शोधली. जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये त्यांची ही पद्धत वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो.
अनिल अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूरमध्ये झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवीही पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. अनिल अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत, त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांमधून दिसून येतं.
1969 साली त्यांचं पहिलं-वहिलं पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध झालं. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात त्यांनी केली. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत पूर्वायुष्यात आणण्याचं काम त्यांनी केलं. मुक्तांगण या संस्थेनं अनेक आयुष्य उध्वस्त होण्यापासून रोखली. अनिल अवचट हे एक डॉक्टर होतेच मात्र त्यांनी समाज परिवर्तनाचाही विडा उचलला होता. समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण करत त्यांनी अनेक कार्य केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :