डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स सन्मान; बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्नांची जागतिक दखल; जगभरातील 10 व्यक्तींचा सन्मान
डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांचे सार्वजनिक आरोग्य आणि विशेष करून बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या कल्पक उपाय योजनांची दखल घेत हा सन्मान जाहीर झाला आहे.

Dr Abhay and Rani Bang honored: बिल गेट्स यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यरत असणाऱ्या गेट्स फाऊंडेशनचा (Gates Foundation) सन्मानाचा गोलकिपर्स चँपियन्स (Goalkeepers Champions Award) हा जागतिक सन्मान ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर झाला. न्यूयॉर्क येथे झालेल्या समारंभात ‘सर्च’च्या वतीने सहसंचालक डॉ. आनंद बंग सहभागी झाले. ‘सर्च’सह जगभरातील दहा संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांना ग्लोबल गोलकिपर हा पुरस्कार देण्यात आला.
बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची दखल
डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग (Dr Abhay and Rani Bang) यांचे सार्वजनिक आरोग्य आणि विशेष करून बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या कल्पक उपाय योजनांची दखल घेत हा सन्मान जाहीर झाला आहे. गेट्स फाऊंडेशन दरवर्षी गोलकिपर्स इव्हेंट हा कार्यक्रम आयोजित करते. 2045 पर्यंत जगभरातील लाखो बालकांचे जीव वाचवण्याचा संकल्प या गोलकिपर्स इव्हेंटमध्ये बिल गेट्स यांनी जाहीर केला. बिल गेट्स म्हणाले की, “2045 पर्यंत जगभरातील लाखो बालमृत्यू रोखण्याची आणि त्यासाठी जबाबदार असणाऱ्या काही जीवघेण्या आजारांना नष्ट करण्याची फार मोठी जबाबदारी आहे आणि मानवता एका महत्त्वाच्या वळणावर आहे.” ते म्हणाले, “आरोग्य सुविधांसाठीच्या निधीत कपात करणे स्वीकारायचे की मुलांना त्यांचा अधिकार असणारे चांगले आयुष्य द्यायचे, यावर आपण पुढील पिढीसाठी काय भवितव्य योजतो ते ठरणार आहे.”
2000 मध्ये जगभरात 10 लाख बालमृत्यू होत असत, आता हे प्रमाण 5 लाखांवर आले आहे. याला फार मोठे यश मानले जाते. पण आरोग्य सुविधांवरील निधीत कपात झाली तर प्रगतीचे हे चक्र उलट फिरू शकते. “लोकांच्या कल्पनेपेक्षा मुलांच्या आरोग्याची आताची स्थिती बिकट आहे. पण आपण विचार करतो, त्यापेक्षा भवितव्य चांगले असणार आहे,” असे ते म्हणाले.
डॉ. अभय बंग यांच्या 75व्या वाढदिवशी पुरस्कार
डॉ. अभय बंग यांचा 75 वा वाढदिवस 23 सप्टेंबरला मंगळवारी साजरा झाला. योगायोगाने याच दिवशी हा जागतिक सन्मान देण्यात आला आहे. ‘सर्च’संस्थेने बालकांना न्यूमोनियासाठीचा उपचार आणि नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी खेड्यातील स्त्रियांना प्रशिक्षत करण्याचे कार्यक्रम सुरू केला. यामुळे अर्भक मृत्यूदर 121 वरून 16 इतका खाली आणता आला. भारत सरकारने हाच उपक्रम ‘आशा’च्या रूपाने 2005ला सुरू केला. आता दरवर्षी देशभरातली 10 लाखांवर आशा सेविका दीड कोटी नवजात बालकांना आऱोग्यसुविधा पुरवतात. डॉ. बंग यांची ही पद्धती जगभरातील 80 देशांत स्वीकारली गेली आहे.
पुरस्कार प्राप्त इतर व्यक्ती अशा
1. डेव्हिड बेकहॅम (इंग्लंड) – मुलांचे आरोग्य आणि शिक्षण
2. क्रिस्टल म्वेसिगा बिरुंगी (युगांडा) – तरुणांचे आरोग्य धोरण
3. टोनी गार्न (जर्मनी) – मुलींचे शिक्षण आणि आरोग्या
4. जॉन ग्रीन (अमेरिका) – तरुणांतील टीबी आणि मानसिक आरोग्यावर संवाद
5. ओसास इघोडारो (नायजेरिया) – मलेरियाविरोधात जनजागृती
6. डॉ. डोनाल्ड कबेरुका (रवांडा) – जागतिक आरोग्य वित्त
7. जेरोप लिमो (केनिया) – एचआयव्ही जनजागृती
8. रीम अल हशिमी (यूएई) – आरोग्य आणि शिक्षण यातील गुंतवणूक
9. डॉ. नवीन ठाकेर (भारत) – बालआरोग्यासाठी सामूदायिक प्रयत्न
इतर महत्वाच्या बातम्या























