संचारबंदी अंशतः शिथिल करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय काही तासातच मागे
चंद्रपुरात कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याने रोजच्या वापरातील काही वस्तूंची दुकानं आजपासून सुरू करण्यात आली होती. मात्र नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने प्रशासनाने आपला निर्णय काही वेळातच मागे घेतला.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील संचारबंदी अंशतः शिथिल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं काही तासातच मागे घेतला आहे. संचारबंदी संबंधीचा हा निर्णय झाल्याचे माहित होताच आज बाजारपेठ लोकांनी फुलून गेली होती. मात्र हे चित्र अंगलट येण्याची शक्यता दिसताच जिल्हा प्रशासनाने निर्णय मागे घेत पुन्हा संचारबंदी जैसे थे कायम ठेवली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्यामुळे आणि सोबतच लोकांनी काही अत्यावश्यक वस्तूंची दुकान सुरु करण्याची प्रशासनाकडे मागणी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्या निर्णयाप्रमाणे रोजच्या वापरातील काही वस्तूंची दुकानं आजपासून सुरू करण्यात आली होती. ज्यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल विक्री-दुरुस्ती, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर, कापड दुकान व लॉन्ड्री यांचा समावेश होता. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही दुकानं उघडी ठेवण्यासाठी वेळ देण्यात आली होती.
प्रत्येक सेवेसाठी वेगवेगळे दिवस ठरवून देण्यात आले होते. मात्र प्रायोगिक तत्वावर हा निर्णय घेतानाच जर अनावश्यक गर्दी होत असेल आणि लोक नियम पळत नसतील, तर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळे हा निर्णय परत घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
VIDEO - #कोरोनाशी लढताना! कोरोनाच्या काळात सणवार, कर्मकांडांमध्ये बदल, करवीरपठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्याशी विशेष संवाद
संबंधित बातम्या : Cabinet Meeting | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय Coronavirus Vaccine | कॅडिला कंपनीचा कोरोना लस बनवल्याचा दावा, प्राण्यांवर चाचणी सुरु केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय