धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अन् नबाब मलिक यांचे जावई दोषी असतील तर कारवाई करावी : गिरीश महाजन
सामाजिक न्यायमंत्री मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि नबाब मलिक यांचे जावई दोषी असतील तर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.
जळगाव : धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना गिरीश महाजन यांनीही त्यांच्या राजीनाम्याची अपेक्षा केली आहे. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे, की त्यांच्यावर झालेल्या विविध आरोपांनंतर मुंडे यांनी आपलं दुसरं कुटुंब आणि अपत्ये असल्याची माहिती दिली आहे, तो चौकशीचा भाग आहे. त्यात काय होईल ते होईल. पण त्यांनी जे दुसरं कुटुंब आणि अपत्ये असल्याचं मान्य केले आहे, त्यावर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नबाब मलिक यांच्या जावयावर जे काही आरोप होत आहेत, ते पाहता ते कोण आहेत कोणाचे जावई आहेत हे महत्वाचे नाही, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, या चौकशीमध्ये जर ते दोषी असतील आणि पुरावे आढळले तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांचा सहभाग असल्यास कारवाई होईल यात राजकारणाचा कोणताही भाग नाही, असं गिरीश महाजन यांनी नबाब मलिक यांच्या जावयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
कोणाच्या जाण्याने भाजपला फरक पडत नाही : महाजन भुसावळ तालुक्यातील वरण गावच्या नगर पंचायतीच्या वतीने महाजन यांच्या काळात विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री गिरीश महाजन यांचा नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केलेल्या भाषणात गिरीश महाजन यांनी भाजप हा विचार धारेवर चालणारा पक्ष आहे, तो कोणा एक व्यक्तीवर चालत नाही. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी खडसे यांचा नामोल्लेख टाळत कोणाच्या जाण्याने भाजपला फरक पडत नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका करताना घराणेशाहीचा आरोप केला आहे. यांच्या घराण्यातील व्यक्तीशिवाय इतर कोणी चालत नसल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Dhananjay Munde Rape Case | बलात्काराच्या आरोपानंतर सामाजिक न्याय मंत्र्यांची पाठराखण की कारवाई?