(Source: Poll of Polls)
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर, भक्तनिवासमध्ये भाविकांना अल्पदरात मिळणार नाश्ता आणि जेवण, मंदिर समितीनं हॉटेल घेतलं ताब्यात
विठ्ठल भक्तांसाठी (Vitthal devotees) एक खुशखबर समोर आली आहे. मंदिर समितीच्या (Mandir Samiti) भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे.
Ashadhi Wari 2024 : विठ्ठल भक्तांसाठी (Vitthal devotees) एक खुशखबर समोर आली आहे. मंदिर समितीच्या (Mandir Samiti) भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. मंदिर समितीने हॉटेल ताब्यात घेतले आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.
विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने उभारलेले विविध भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो. अतिशय भव्य स्वरुपात उभारलेल्या या विविध भक्तनिवासांमध्ये असलेल्या 364 रुममध्ये जवळपास रोज 1500 भाविक निवास करु शकतात. अतिशय आलिशान पद्धतीने उभारलेले नवीन भक्त निवास तर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. या भक्त निवासामध्ये देशभरातून येणाऱ्या भाविकांना चांगल्या प्रतीचे चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी या हॉटेलचा ठेका देण्यात आला होता. मात्र, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.
भाविकांच्या खिशाला लागणारी कात्री होणार बंद
कालपासून याची सुरुवात झाली असून भाविक येथील अल्पदरात मिळणाऱ्या आणि चांगल्या प्रतीच्या खाद्यपदार्थावर खुश असून मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून आहेत. यासाठी मंदिर समितीचे येथे येणाऱ्या देशभरातील भाविकांना चहा , कॉफी , दूध आणि नाश्त्याच्या दरात निम्म्याने कपात केली असून जेवणाची थाळी तर केवळ 100 रुपयात ठेवल्याने भाविकांच्या खिशाला कात्री लागणे बंद होणार आहे. या भक्तनिवासमध्ये वर्षभरात देशभरातून तीन लाखापेक्षा जास्त भाविक निवासासाठी येत असतात. आता मंदिर समिती या भाविकांना चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ अतिशय अल्पदरात देणार आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविका दाखल होण्यास सुरुवात
आषाढी वारीचा सोहळा जवळ आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविका दाखल होण्यास सुरुवात देखील झाली आहे. या वारीला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं रवाना होत असतो. दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या आहेत. या पालखी सोहळ्याबरोबर लाखो वारकरी आहेत. सर्व वारकरी हरीनामाच्या गरजात तल्लीन असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. आषाढी वारी सोहळ्याची संपूर्ण तयार प्रशासनानं केली आहे. जेणेकरुन पंढरीत येणाऱ्या भाविकांनी कोणताही त्रास होऊ नये.