Devendra Fadnavis : कुणीही एकत्र येवो, महापालिका आम्हीच जिंकणार; ठाकरे बंधू एकत्र येणार का? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray Uddhav Thackeray : दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्हाला आनंदच, आम्ही त्याचं स्वागत करु असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात जोरदारपणे सुरू आहेत. आधी राज ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर त्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे संकेत असल्याचीही चर्चा आहे. त्यावर आता भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतभेद विसरुन दोघे एकत्र येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे. पण त्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर इतकी घाई करू नका, थोडी वाट पाहा असंही सूचकपणे ते म्हणाले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कुणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर त्यात काही वाईट नाही. दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. पण या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. घाई करू नका, थोडी वाट पाहा. ते दोघे एकत्र आले तर आम्ही त्याचे स्वागत करतो."
ऑफर देणारे एक आणि त्याला प्रतिसाद देणारे दुसरे. त्यामुळे मी यावर जास्त काही बोलू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महापालिकेमध्ये भाजप यश मिळवणार
दोन ठाकरे एकत्र आले तर ताकद वाढून आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. या शक्यतेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कुणीही एकत्र येवो. मुंबई महापालिका असो वा कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात एनडीएच विजय मिळवणार."
ठाकरे बंधू एकत्र येणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी एक चर्चा असते ती म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? ही आता ही चर्चा गंभीर वळणावर गेली आहे. त्याचं कारण खुद्द राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि एकत्र येण्याचे संकेत दिलेत. त्यांच्या या टाळीला उद्धव ठाकरे यांनीही वेळ न दवडता तात्काळ प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत, अशा निसंदिग्ध शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना संकेत दिले. त्याहीपुढे जात एकत्र येणं हे कठीण नाही, पण प्रश्न इच्छेचा आहे असं राज ठाकरे म्हणाले. महेश मांजरेकर यांच्या यूट्यूबवरील मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं.
राज ठाकरे यांच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देणार याची उत्सुकता होती. राज यांची मुलाखत प्रसारित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर दिलं. आपल्याकडून भांडण नव्हतं, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायलाही तयार आहोत असं उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं. पण त्यासोबतच राज ठाकरेंसमोर एक अटही ठेवली. भाजपसोबत जायचं आहे की आपल्यासोबत ते ठरवा. महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याच्या पंक्तीला बसणार नाही, याचा निर्णय घ्या असं उद्धव ठाकरे म्हणाले.























