मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना गावी पाठवण्याचा निर्णय चार दिवसात : भास्कर जाधव
कोरोनाचा शिरकाव राज्यात झालेला नसतानाही त्यावेळी सुरू असलेल्या अधिवेशनात आपण सातत्याने या संदर्भात आपली भूमिका मांडली होते आता त्याला यश येत आहे
मुंबई : मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांना गावी पाठवण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असला तरी या संदर्भातील सुरु असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आशिष कुमार सिंग यांनी यासंदर्भात काल आपणाशी तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे चाकरमान्यांनो बॅगा भरून ठेवा, सरकारकडून येत्या चार दिवसात गावी पाठवण्याचा निर्णय होईल अशी माहिती माजी मंत्री व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली
जाधव पुढे म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून कोरोनामुळे मुंबई पुणे येथे अडकून पडलेल्या चाकरमान्यांना गावी आणण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अडकून पडलेल्या चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी आपण पाठपुरावा चालवला. ज्यावेळी कोरोनाचा शिरकाव राज्यात झालेला नसतानाही त्यावेळी सुरू असलेल्या अधिवेशनात आपण सातत्याने या संदर्भात आपली भूमिका मांडली होते आता त्याला यश येत आहे. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आशिष कुमार सिंग यांनी त्यासंदर्भात मंगळवारी आपणाकडून अधिक माहिती घेतली तसेच जिल्हाधिकारी पोलीस अधिक्षक यांच्याकडूनही काय उपाययोजना करता येईल हे समजावून घेतलं त्यामुळे चार दिवसात सरकारकडून चाकरमान्यांना गावी पाठवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल. लॉकडाऊनमुळे कोंडून राहिलेल्या चाकरमान्यांना बाहेर काढणे महत्वाचे बनले आहे.
चाकरमान्यांना गावी आणताना एसटी बसचा पर्याय महत्वाचा आहे. आपण त्यासंदर्भात काही सूचना केल्या आहेत. एका फेरीत एसटी बसने केवळ 30 चाकरमान्यांना त्यांच्या गावी पाठवले जाईल या गावात त्यांना विरोध होईल तेथे एकत्रितपणे त्यांच्या राहण्यासह खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाईल. मुंबईतून निघताना आणि येथे आल्यानंतर नियमितपणे त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. गावात विलगीकरण करताना येणाऱ्या या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. मुळातच आजचा अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मोठा गोंधळ सुरू आहे. गावात बाहेरचे भाजीवाले कांदा बटाटे वाले गाड्या घेऊन आलेले चालतात. मग गावात चाकरमणी का नकोत, त्यांनाच विरोध का? गावागावातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आपण मतदार संघाचा दौरा करत गावातील प्रमुख मंडळींशी चर्चा केली त्यांना ते पटवून दिले त्यानुसार आता सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. ग्रामस्थही चाकरमान्यांना स्वीकारण्यास तयार झाले आहेत त्यामुळे आता कोणतीही अडचण येणार नाही.
लॉकडाऊनच्या काळात आपण अनेकांना मदत केली उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा अपडेट ठेवली. आजच्या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली पुरता गोंधळ सुरू आहे त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी कालच डीवायएसपी दर्जाचा अधिकारी नियुक्त केला आहे. मुंबईमध्ये तर स्वतंत्र यंत्रणा उभारून त्यानुसार आरोग्य मदत कार्य सुरू ठेवले आपण कुठेही याची जाहीर वाच्यता केली नाही. मदतकार्य आजही सुरू आहे. कोकणचे अर्थकारण ज्याच्यावर अवलंबून आहे त्या चाकरमान्यांना गावाकडे आणलेच पाहिजे असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईस्थित कोकणातील चाकरमान्यांना गावी आणण्याबाबतच्या मुद्यावरून सध्या कोकणात राजकारण देखील सुरू असल्याचं दिसून येतं आहे. दरम्यान या प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये. ही वेळ राजकारणाची नाही. योग्य वेळी आणि योग्य ती खबरदारी घेत चाकरमान्यांना त्यांच्या मुळगावी आणलं जाईल, त्याबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरीत शिमग्याकरता आलेल्यांची संख्या ही 1 लाख 16 हजार आहे. ही लोकं लॉकडाऊननंतर रत्नागिरीमध्ये आलेली नाहीत. अशा लोकांची संख्या ही 900 ते 1000च्या घरात असल्याचं देखील सामंत यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या :