Daund Teacher Suicide : विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला अन् प्राथमिक शिक्षकाने वर्गातच संपवलं आयुष्य; पत्र पाहून सगळेच चक्रावले...
एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने वर्गातच विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.शाळेतील 9 विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने आत्महत्या केल्याचंं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय.
Daund Teacher Suicide : दौंड तालुक्यात शिक्षण क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्राथमिक शाळेतील 46 वर्षीय शिक्षकाने वर्गातच विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली. शाळेतील दहापैकी 9 विद्यार्थ्यांनी जवळच्या दुसऱ्या बहुशिक्षकी शाळेत प्रवेश घेतल्याने आत्महत्या केल्याचंं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. अरविंद देवकर असे शिक्षकाचे नाव आहे.
दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. या शिक्षकाने शाळेतील कामे विद्यार्थ्यांना करायला सांगितल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत टाकले. त्यामुळे शिक्षकाला याचा पश्चाताप झाला आणि त्या निराशेतूनच शिक्षकाने आपले आयुष्य संपवले. आत्महत्या केलेल्या शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
चिट्ठीत (सुसाईड नोट) काय लिहिलं आहे?
'मी. श्री. अरविंद ज्ञानेश्वर देवकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होलेवस्ती. पद उपशिक्षक नियुक्ती. एकूण सेवा 19 वर्ष 4 महिने. पहिली शाळा जि. प. प्राथ. शाळा खुपटेवरती 12 वर्ष, दुसरी शाळा जि. प प्राथ शाळा मिरवडी 6 वर्ष आणि तिसरी शाळा जि. प. प्राथ शाळा होलेवस्ती, ता दौड, जि. पुणे 2 महिने. शाळा खुपटेवस्ती आणि मिरवडी या ठिकाणी माझी सेवा चांगली झाली कारण चांगले सरकारी शिक्षक लाभल्याने परंतु होलेवस्ती या ठिकाणी एकशिक्षकी शाळा असल्याने सुरुवातीला कामाच्या गोंधळात मी बावरून गेलो. मला पाहिजे त्या पद्धतीने पालकवर्गाची मने जिंकता आली नाहीत. जून महिन्यात सुरुवातीची 13 दिवस मी विद्यार्थ्यांना अध्यापन करु शकलो नाही कारण शाळा मैदान साफसफाई लिखाणकाम आणि विद्यार्थ्यांची ओळख गप्पा, गाणी, गोष्टी वेळ गेला. त्यात विद्यार्थ्याकडून मी शौचालय साफ करून घेणे ही गोष्ट पालकांना खटकली. त्यातच शाळा व्यवस्थापन समितीची मिटींग घेतल्यानंतर कणकणी आल्याने जेवणाच्या सुट्टीत 1:30 ते 2.30 वेळेत 20 मिनिट गोळी खाऊन आराम केला. त्यातच एका विद्यार्थ्याला दुखापत झाली या माझ्या चुकांमुळे पालकवर्ग नाराज होऊन 10 पैकी 9 विद्यार्थ्यांनी या शाळेतील खालच्या जि. प. प्राथमिक शाळा जावनीबुवाची वाडी या ठिकाणी प्रविष्ट केली आणि माझ्य़ा शाळेत इयत्ता पहिलीत एकच विद्यार्थी राहिला. या घटनेनंतर मी पालकवर्गाची माफी मागून विनंती करूनही फक्त एकच संधी दया, अशी विनवणी करूनही मला कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अपराधीपणाची भावना माझ्या मनात खोलवर रुजली. याला फक्त मी आणि मीच जबाबदार असून सहनाशिलता संपल्याने, समाजाचे माझ्याकडून नुकसान झाल्याने याच पवित्र मंदिरात मी माझ्या देहाचा त्याग करीत आहे. यास सर्वस्वी बीच जबाबदार आहे. कोणासही जबाबदार धरु नये', असं शिक्षकाने सुसाईड नोटमध्य़े लिहिलं आहे.