Pune News : दगडूशेठ गणपती मंदिर आणि शनिवारवाडा कितपत सुरक्षित? तपास यंत्रणांच्या अहवालात चिंता वाढवणारी माहिती
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि शनिवारवाडा या प्रसिद्ध ठिकाणच्या सुरक्षेबाबत तपास यंत्रणांना त्रुटी आढळल्या आहेत.
Pune News : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (dagdusheth ganpati mandir) आणि शनिवारवाड्याच्या (shaniwarwada) सुरक्षितेबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. पुण्यातील या प्रसिद्ध ठिकाणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात त्रुटी आढळल्या आहेत. गर्दीची ठिकाणं असल्याने या ठिकाणी घातपाताची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहेत. पोलिसांकडून महापालिका आयुक्तांना अहवाल देण्यात आला आहे.
पुण्यातील शनिवारवाडाच्या सुरक्षिततेबाबत भारतीय पुरातत्व विभागाने पत्र लिहिलं आहे. गणेशोत्सवा दरम्यान तसंच इतर दिवशी शनिवारवाडा बाहेरील परिसरात अनाधिकृत दुकाने लावण्यास परवानगी देऊ नका, असं पत्र पुरातत्व विभागाने महापालिका आयुक्तांना दिलं आहे. विश्रामबाग पोलिसांनादेखील या संदर्भात पुरातत्व विभागाने पत्र लिहिलं आहे.
शनिवारवाडा हे एक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आणि ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येते. देश-विदेशातील पर्यटक शनिवारवाडा पाहण्यासाठी येत असतात. 4 एप्रिल 2022 या दिवशी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलीस यंत्रणा यांनी सर्वे केला होता. शनिवारवाडाच्या परिसराची पाहणी केली असता त्यांना काही त्रुटी जाणवल्यात होती. त्यामुळे त्यांनी महापालिका आणि पोलिसांंना पत्र लिहिलं आहे.
शनिवारवाडाच्या बाहेरील दुकानं अनाधिकृत
गणेशोत्सवादरम्यान शनिवारवाडाच्या बाहेरील बाजूला अनाधिकृत दुकाने उघडण्यात येतात. शनिवारवाड्याच्या जवळ असणाऱ्या शिवाजी मार्ग या रस्त्यावर पत्रा शेड आणि मोठ्या प्रमाणात मंडपं लावून दुकानं उभारली जातात. गणेशोत्सवानंतर शनिवारवाडाच्या परिसरात कचरा टाकला जातो त्यामुळे तेथे दुर्गंधी होते तसेच इतर दिवशी देखील दुकान लावली जातात. शनिवारवाडाच्या बाहेरील परिसरात दुकानदार कचरादेखील टाकतात त्यामुळे अशा दुकानांना परवानगी देऊ नका, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी अधिक सूचना कोणत्या?
-शिवाजी रस्त्यावरून गणपतीच्या मुख दर्शनासाठी वापरण्यात येणारी सध्याची कडक काचेची खिडकी बुलेटप्रूफ काचेने बदलली जाऊ शकते.
-सण-उत्सवाच्या वेळी मंदिरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात यावी.
-सुरक्षा तपासणी किंवा खाजगी सुरक्षा रक्षक आणि आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंची नियमितपणे तपासणी करावी.
-पुरेसे DFMDS HMDSX-Ray स्कॅनर येथे स्थापित करावे.
- अग्निशमन संबंधित उपकरणं वाढवणं आवश्यक आहे.
-इलेक्ट्रिकल ऑडिट करणंदेखील महत्वाचं आहे.
-नियमित सुरक्षिततेसाठी आणि कोणत्याही अत्यावश्यकतेसाठी एक नियमावली तयार करणं आवश्यक आहे.