CoronaVaccine | मुंबईत लशींचा तुटवडा, केवळ 3 दिवस पुरेल इतकाच साठा
मुंबईत 108 लसीकरणाचे केंद्र आहेत, तर दर दिवसाला सरासरी 50 हजार लोकांचे लसीकरण होते. लसींचा साठा मुंबईतील 108 केंद्रांवर समसमान वाटला गेला तर 1500 ते 1600 लसी एका सेंटरच्या वाट्याला येतात.
मुंबई : राज्याकडून वारंवार लसींच्या पुरवठ्याबाबत विनंती करुनही केंद्राकडून लस पुरवठा होत नाही. पुढचा साठा येईपर्यंत मुंबईत केवळ 1 लाख 85 हजार लसीच शिल्लक आहेत. यामध्ये कोविशिल्डचे 1 लाख 76 हजार 540 डोस तर कोवॅक्सिनचे केवळ 8840 डोस शिल्लक आहेत. त्यामुळे कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणा-यांची अडचण होण्याचीही शक्यता आहे.
प्रत्यक्षात मुंबईची गरज ही 8 ते 10 लाख लशींच्या डोसची आहे. यापैकी 5 ते 6 लाख रिझर्व्हमध्ये साठा हवा जर 5 लाखांपेक्षा कमी स्टॉक झाला तर त्याचा लसीकरण मोहिमेच्या वेगाला फटका बसतो. पुढचा साठा 15 एप्रिलला येणार, तोही अपुराच पडणार आहे.
मुंबईत 108 लसीकरणाचे केंद्र आहेत, तर दर दिवसाला सरासरी 50 हजार लोकांचे लसीकरण होते. लसींचा साठा मुंबईतील 108 केंद्रांवर समसमान वाटला गेला तर 1500 ते 1600 लसी एका सेंटरच्या वाट्याला येतात. मात्र, बीकेसी सारखे जम्बो वॅक्सिनेशन सेंटर असेल किंवा खाजगी हॉस्पिटलने पैसे भरुन जास्त लसी ताब्यात घेतल्या तर लसींचा हा साठा अपुरा पडतो.
15 एप्रिललाच पुढचा साठा मिळणार
पुढच्या पुरवठ्यात महाराष्ट्रासाठी साडेसात लाख लसी मिळणार आहेत. त्यांपैकी मुंबईला एक- दीड लाखच लशींचे डोस मिळणार आहेत. मुंबईत 68 खाजगी लसीकरण सेंटर आहेत. त्या ठिकाणी पैसे देऊन लस विकत घेतली जाते त्यामुळे सरकारी सेंटरवर लसीचे डोस अपुरे पडले तरी ते परत घेता येत नाहीत. जर, लशीचा असाच तुटवडा जाणवत राहिला तर खाजगी हॉस्पिटल आणि खाजगी केंद्राकडून मोठ्या संख्येनं लसी विकत घेतल्या जातील आणि त्याचा काळाबाजार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
राज्य शासनाने विनंती करुनही महाराष्ट्राला लस नाही. प्रत्यक्षात महाराष्ट्र लसीकरणाबाबत संपूर्ण देशात आघाडीवर आहे मात्र, तेवढ्या प्रमाणात लसी उपलब्ध नाहीत.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा. 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.