अकोलेतील 'आदर्श' शिक्षक; निधी गोळा करून शिक्षकांनी उभारले 60 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर
अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आरोग्य सेवा अपुऱ्या पडत होत्या. मात्र शिक्षकांनी पुढाकार घेत हे कोविड सेंटर सुरू केल्यानंतर आता गरजू व सामान्य रुग्णांना मदत मिळणार आहे.
अहमदनगर : दुर्गम भाग आणि आदिवासी तालुका अशी अकोले तालुक्याची ओळख. पहिल्या लाटेत सुरक्षित असलेल्या या तालुक्यात मात्र दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबांना कोरोनाने विळखा घातला 191 गावांपैकी तब्बल 150 हून अधिक गावातील अनेक लोक बाधित झाले. अकोलेत मोजकेच ऑक्सिजन बेड उपलब्ध असून ते बेड पेशंट संख्येच्या तुलनेत अत्यंत नगण्य होते. अशा परिस्थितीत या संकटाला तोंड देण्यासाठी शिक्षकांनी एकत्र येत निधी जमवला व अवघ्या सात दिवसात 60 ऑक्सिजन बेड असलेलं कोविड हॉस्पिटल उभारले. याला गावातील अनेक दानशूर व्यक्तींची साथ मिळाली.
अकोले तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसात वाढत असताना रुग्णांना उपचारासाठी नाशिक, संगमनेर सह इतर ठिकाणी वणवण करण्याची वेळ आली आणि बाहेर जाऊनही बेड मिळत नसल्याने अनेकांचे जीव धोक्यात आले. हीच गरज ओळखून अकोले तालुका शिक्षक समन्वय समितीच्या सहकार्याने उभारलेले 60 बेडचे ऑक्सिजन कोव्हिड हॉस्पिटल आता गरजूंना मोठा आधार देत आहे..
संगमनेर आणि नाशिकला बेड मिळत नव्हते. आजही हा त्रास सुरू आहे. अकोल्यात संवेदनशील मनाच्या प्राथमिक शिक्षकांनी निधी जमवायला पुढाकार घेतला. दोन तीन दिवसांत दोन अडीच लाख रुपये निधी उभा राहिला. या कामाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल हे तेव्हा कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं. आधी माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षक आणि नंतर महाविद्यालयातले प्राध्यापक सोबत आले आहे आणि यात अनेक दानशूर व्यक्तींनी ही मदत केल्याने आज हे हॉस्पिटल सुरू झाल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिलीय.
अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आरोग्य सेवा अपुऱ्या पडत होत्या. मात्र शिक्षकांनी पुढाकार घेत हे कोविड सेंटर सुरू केल्यानंतर आता गरजू व सामान्य रुग्णांना मदत मिळणार असलायची माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिलीय. सुगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे सेंटर सुरू केले असून याठिकाणी ऑक्सिजन कमी पडू मये यासाठी प्रशासन व आमदार काळजी घेत असून आमचे आरोग्य कर्मचारी पूर्ण वेळ याठिकाणी काम करत असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. संजय घोगरे यांनी दिलीय.
या कोविड सेंटरसाठी अकोलेतील आजी माजी आमदार यासह अनेक दानशूर व्यक्तींनी निधी दिला असून सर्वपक्षीय कार्यकर्ते यात सहभागी झाले आहे. अशा पद्धतीने जर राज्यात असे उपक्रम राबविले गेले तर कोरोनाच्या संकटात रुग्णांना मोठा आधार मिळेल यात शंका नाही.