चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Worli News: सूरज यादव सचिन कोठेकर यांच्या चायनीज पदार्थांच्या गाडीवर कामाला होता.
Worli News मुंबई: मुंबईतल्या वरळी येथील नरिमन भाट नगर परिसरात एका कर्मचाऱ्याचा धक्कादायक मृत्यू झाला. सूरज यादव (19 वर्षीय) असं त्या दुर्दैवी कर्मचाऱ्याचं नाव आहे. ही घटना एका चायनीज खाद्यपदार्थांच्या फॅक्टरीत घडली. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलं आहे.
खाद्यपदार्थांच्या फॅक्टरीत चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरवर काम करताना त्या कर्मचाऱ्याचा शर्ट अडकून तो आत ओढला गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढलं. पण या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळं एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा मालकावर दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
सूरज यादव सचिन कोठेकर यांच्या चायनीज पदार्थांच्या गाडीवर कामाला होता. त्याचा चुलत भाऊ महेश यादव याने दिलेल्या तक्रारीनुसार चायनीज भेळ आणि भजी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ग्राईंडर मशिनवर तयार केला जातो. हे मशिन नरिमन भाटनगर येथील एका खोलीत ठेवले होते. सचिन यांनी सूरजला कच्चा माल आणण्यासाठी ग्राईंडर असलेल्या खोलीकडे पाठवले. सूरज मशिनमधून माल काढत असताना मशिनमध्येच अडकला. या संदर्भातील माहिती मिळताच सचिन कोठेकर आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, पोलिसांच्या मदतीने सूरजला मशिनमधून बाहेर काढले. जबर जखमी अवस्थेत त्याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य-
कंबाला हिल येथे महिलेला पाहून अश्लील चाळे करणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला गावदेवी पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपी आग्रा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिला 30 नोव्हेंबरला टॅक्सीतून जात असताना कंबाला हिल बस थांब्याजवळ उभा असलेला एक तरुण पीडित महिलेला पाहून अश्लील चाळे करत होता. पीडित महिलेने याबाबत गावदेवी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांना आरोपी आग्रा येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यानूसार पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीला अटक केली.