Chhagan Bhujbal On NCP | जहाँ नहीं चैना, वहा नहीं रूकना, छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार?
Chhagan Bhujbal On NCP | जहाँ नहीं चैना, वहा नहीं रूकना, छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार?
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजितदादा गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या छगन भुजबळ यांना नेहमीप्रमाणे मंत्रीपद मिळणार, याबद्दल अनेकांना खात्री होती. मात्र, रविवारी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 मंत्र्यांच्या यादीत छगन भुजबळ यांचे नाव नसल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळाला धक्का बसला होता. छगन भुजबळ यांच्यासारख्या ताकदवान ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळातून बाहेर कसे ठेवले गेले, असा प्रश्न कालपासून सर्वतोमुखी आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
भाजप आमदाराने छगन भुजबळ यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जाणार असल्याचा दावा केला आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला नाही. त्यांना राज्यपाल केले जाणार आहे, असा दावा भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केला. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणत्याही आमदारांमध्ये नाराजी नाही, असेही देशमुख यांनी म्हटले. देशमुख यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. छगन भुजबळ यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकद अजूनही कायम आहे. ओबीसी नेता म्हणून त्यांचे राजकीय वजन मोठे आहे. अशा परिस्थितीत छगन भुजबळ हे राज्यपाल पद स्वीकारण्यास राजी होतील का, हाच मोठा प्रश्न आहे. यावर आता छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.