Maharashtra Corona : तिसऱ्या लाटेचा धोका, उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी : मुख्यमंत्री
कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
![Maharashtra Corona : तिसऱ्या लाटेचा धोका, उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी : मुख्यमंत्री Coronavirus Third Wave Threat Industry Permanent Covid Compatible Operating System Should Be Created CM Uddhav Thackeray Maharashtra Corona : तिसऱ्या लाटेचा धोका, उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी : मुख्यमंत्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/02/72e6c96ed68bcf7f3fbfeb1b303495ed_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्योगांना केले. कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. यावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे असा एकमुखाने विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला.
उद्योगांचा टास्क फोर्स तातडीने स्थापणार
राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे तसेच कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले.
उद्योगांनी दिली नि:संदेह खात्री
बैठकीत राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात येत आहे असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगीतले. याशिवाय विलगीकरण बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढविणे यामध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरु करतील असेही सांगण्यात आले. सर्व उद्योगपती हे राज्याच्या परिवारातले असून या संकटसमयी त्यांनी पुढे येऊन मदत करावी असे कळकळीचे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, कोविडसंदर्भातील सुविधा उभारणे किंवा याविषयी आवश्यक त्या बाबींमध्ये राज्य शासन तातडीने मदत करेल.
तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी उद्योगांनी नियोजन करावे
ऑक्सिजनची राज्याला खूप गरज असून सध्या सर्व उत्पादित ऑक्सिजन वैद्यकीय कारणास्तव वापरला जात आहे. रुग्ण संख्या पाहता आणखी ऑक्सिजनची गरज भासत असून आपण पंतप्रधानांना देखील तसे कळविले आहे. कालही त्यांना संध्याकाळी संपर्क केला होतं मात्र ते पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यस्त असल्याने बोलणे होऊ शकले नाही मात्र केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य मिळते आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोविडच्या किती लाटा येतील ते आज सांगू शकत नाही मात्र आता राज्यातील उद्योगांनी सुद्धा येणाऱ्या लाटेला तोंड देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन आत्तापासूनच करावे उदाहरणादाखल कोविड सुसंगत कार्यप्रणाली स्वीकारणे, चाचणी व लसीकरणाच्या सुविधा उभारणे, कामगार व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष यंत्रणा निर्माण करणे, आपल्या परिसरात विलगीकरण व्यवस्था उभारणे तसेच बेड्स उपलब्ध ठेवणे, वर्क फ्रॉम होमची यंत्रणा विकसित करणे, कामगारांच्या कामाच्या वेळांत तसे अनुरूप बदल करणे अशा सूचना त्यांनी दिल्या.
उद्योगांनी ऑक्सिजन उत्पादन करावे
डॉ प्रदीप व्यास यांनी सध्याची परिस्थिती किती गंभीर होत आहे याकडे लक्ष वेधले. तुलनेने मृत्यू दर कमी असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अवघ्या ४० दिवसांवर आला आहे हे सांगून ते म्हणाले की, आपण दहा लक्ष लोकसंख्येत दररोज सुमारे ३ लाख चाचण्या करीत आहोत. उद्योगांनी त्यांच्या आवारात नवीन तंत्रज्ञानावर आधारित हवेतील ऑक्सिजन शोषून उत्पादन करणारे छोटे प्रकल्प सुरु करावेत तसेच उत्पादित ऑक्सिजन पूर्णपणे वैद्यकीय कारणासाठी द्यावा असेही ते म्हणाले.
उद्योग उपलब्ध करून देणार ऑक्सिजन
बैठकीत सर्व उद्योगपतीच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात जेएसडब्ल्यू , महिंद्र, गोदरेज, बजाज, रिलायन्स, टाटा, ब्ल्यू स्टार,एल एंड टी , इन्फोसिस , कायनेटिक इंजिनीअरिंग यांच्या प्रतिनिधींनी बोलताना विशेषत: ऑक्सिजन उपलब्धता करून देण्यात येईल तसेच त्यांच्या उद्योगांच्या परिसरात चाचणी केंद्रे उभारणे , लसीकरण मोहिमा घेऊन जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सुरक्षित करणे यासाठी तातडीने पाउले उचल आहोत असे आश्वासन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)