महाराष्ट्रात तीन नव्या कोरोना व्हेरियंटचा शिरकाव, राज्यात आज 418 नवे रुग्ण आढळले
Coronavirus New variant : राज्यात आज 418 नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus New variant : दिवळी जवळ आल्यामुळे खरेदीसाठी बाजरपेठात लोकांची गर्दी वाढली आहे. अशातच कोरोना विषाणूच्या तीन नव्या व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेतच. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एक्सबीबी या व्हेरियंटचे 18 नवे रग्ण आढळले आहेत. तर बीक्यू.1 आणि बीए.2.3.20 या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. नव्या कोरोना रुग्णांमुळे कोरोना विषाणूचा फैलाव आणखी होण्याची शक्यता आहे. जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा एक भाग असून त्यामुळे घाबरून न जाता कोरोना संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तीन नव्या व्हेरियंटचे 20 रुग्ण आढळले आहेत. इन्साकॉग प्रयोगशाळांच्या ताज्या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये राज्यात एक्सबीबी या व्हेरियंटचे एकूण 18 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 13 रुग्ण हे पुण्यातील आहेत. नागपूर आणि ठाणे येथील प्रत्येकी दोन तर अकोला येथील एक रुग्ण आहे. या शिवाय पुण्यातच बीक्यू.1 आणि बीए.2.3.20 या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या सर्व रुग्णांची साथरोग शास्त्रीय माहिती घेण्यात येत असून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे सर्व रुग्ण सौम्य स्वरूपाचे आहेत. या 20 पैकी 15 जणांनी लसीकरण घेतलेले असून पाच जणांची माहिती अप्राप्त आहे. पुण्यातील बीक्यू.1 रुग्ण सौम्य स्वरूपाचा असून त्याचा अमेरिका प्रवासाचा इतिहास आहे. जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा एक भाग असून त्यामुळे घाबरून न जाता कोविड संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
राज्यात आज 418 नवे रुग्ण -
राज्यात आज 418 नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 515 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 79,77,611 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.14 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 418 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ३ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,51,11,673 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 81,28,676 (09.55 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.