Coronavirus | अँटीबॉडी टेस्ट पॉझिटीव्ह आल्यास आनंदाची बाब : डॉ. कानन येळीकर
कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला तर अनेक लोकांना भिती वाटते. मात्र, अँटीबॉडी टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आला तर मात्र घाबरण्याचं काहीच कारण नाही. ही तर आनंदाची बाब असल्याचं डॉ. कानन येळीकर यांनी सांगितलं आहे.
औरंगाबाद : कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली तर भिती वाटते, मात्र अँटीबॉडी टेस्ट पॉझिटीव्ह आल्यास आनंदाची बाब आहे. त्यामुळे सहा दिवस 115 वार्डात चालणाऱ्या या सिरो सर्वेक्षणात नागरिकांनी स्वतःहुन पुढे येऊ चाचणी करून सहकार्य करावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी केले. त्या औरंगाबाद महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, एमजीएम आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी आयोजित सिरो सर्वेक्षणाचा प्रारंभ करताना तापडिया कासलीवाल मैदानावर सोमवारी बोलत होत्या. आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले, की आजपासून शहरातील 115 वॉर्डांमध्ये 'सिरो सर्वेक्षण' अँटी बॉडी टेस्टची सुरुवात करण्यात आली आहे. शहरात 10 ते 15ऑगस्ट या कालावधीत शहरातील 115वार्ड मध्ये 'सिरो सर्वेक्षण' करण्यात येणार आहे. हे काम महापालिका आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी हाती घेतले. कोरोना नियंत्रणासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल केंद्र स्तरावरही घेण्यात आली. आता 'सिरो सर्वेक्षण' सुरु करून दिल्ली, मुंबईनंतर औरंगाबाद महापालिकेने बाजी मारली. या मोहिमेत प्रत्येक वार्डमधून किमान 35 ते 40 जणांच्या रक्ताचे नमुने घेतले जातील. यातून अँटी बॉडी तयार झाल्या आहेत का? याची तपासणी केली जाईल. 6 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत 20 पथके आहेत. यातील एका पथकात 2 डॉक्टर, 1 लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि भारतीय जैन संघटनेचा 1 प्रतिनिधी आहे. या सिरो सर्वेक्षणसाठी भारतीय जैन संघटनेने 20 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून यात सर्व यंत्रणा उपलब्ध राहणार आहे.
एक पथकातील संख्या लक्षात घेता या मोहिमेत सलग 6 दिवस 20 डॉक्टर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 20 डॉक्टर हे एमजीएम महाविद्यालयातील असणार आहेत. या सर्वेक्षणात प्रत्येक वार्डातील लोकसंख्या लक्षात घेऊन चिठ्या टाकून त्या भागाची निवड करण्यात आली आहे. हे रँडम सॅमपल सर्वे होणार आहे. यात प्रत्येकी 10 घरानंतर एका घरातील एका व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेण्यात येणार असून या कुटुंबातील लोकांच्या शरीरातील अँटी बॉडी तपासल्या जाणार आहेत. या टेस्टमुळे त्या व्यक्तीला व त्या भागातील इतर किती नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, हे कळेल. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी मदत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे यात कोणत्याही नागरिकास क्वॉरंटाईन किंवा आयसोलेट केले जाणार नाही. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि या सिरो सर्वेक्षणसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करावे.
अँटीबॉडी म्हणजे काय?
अँटीबॉडीच्या मदतीनं व्हायरसचा परिणाम संपवू शकतो. अँटीबॉडी शरीरातील असं तत्त्व आहे, ज्याची निर्मिती आपली इम्यून सिस्टिम करतं. खरं तर व्यक्ती जेव्हा कुठल्याही व्हायरसच्या संपर्कात येतो, तेव्हा शरीराच्या रक्तात आणि टिश्यूमध्ये असणारी अँटीबॉडी तयार होऊ लागते. या अँटीबॉडी म्हणजे प्रोटीन्स असतात, जे व्हायरसला शरीरात पसरण्यापासून थांबवतात. कोरोनासोबत लढा देण्यासाठी अँटीबॉडी महत्त्वाची भूमिका निभावतात. मात्र अनेकदा संक्रमणानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होण्यासाठी उशीर लागतो. अँटीबॉडीज बनण्यासाठी एक आठवड्यांचा काळ लागू शकतो. सध्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोकं अँटीबॉडी टेस्ट करवून घेत आहेत. टेस्टद्वारे आपल्याला माहिती होतं की, शरीर अँटीबॉडीज तयार करू शकतं की नाही. शरीरात अँटीबॉडी असेल तर असा निष्कर्ष काढला जातो की, आपण कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेले आहात.
कशी होते अँटीबॉडी टेस्ट?
अँटीबॉडी टेस्टमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. यात रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्या अँटीबॉडीजची तपासणी ही अँटीबॉडीज टेस्टमध्ये केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या :
- सार्वजनिक वाहतुकीच्या मागणीसाठी वंचित बहूजन आघाडीचं 'डफली बजाव' आंदोलन
- "कोविड पॉझिटिव्ह नको असेल, तर फाटके कपडे घाला" : माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे
- 'कामं होतं नसतील तर दंगा करा' मंत्री यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
- खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश : राजेश टोपे
- अमेरिकेत कोरोनामुळे एक डिसेंबरपर्यंत तीन लाख लोकांचा जीव जाण्याची शक्यता : मॉडेल