"कोविड पॉझिटिव्ह नको असेल, तर फाटके कपडे घाला" : माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे
कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट नको असेल तर फाटके कपडे घाला, असे वक्तव्य माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सोलापूर येथील काँग्रेसच्या बैठकीत केले अन् हास्याचे फवारे उडाले.
सोलापूर : ''चांगले कपडे घातले, सूट, बूट घातलं की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात. फाटके कपडे घातले की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत. त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्हचं येतात.'' असे विधान माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी भर बैठकीत केलं. शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर ये दोघे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काँग्रेस कमिटीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली. या बैठकीत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे देखील उपस्थित होते. कोरोना विषयी बोलताना सिद्धाराम म्हेत्रे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बैठकीत हशा पिकला.
''चांगले कपडे घातले, सूट, बूट घातलं की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात. फाटके कपडे घातले की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत. त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्हचं येतात. अशी सगळी कोविडची परिस्थिती आहे. त्यामुळे या कोरोनाला घाबरण्याची गरज नाहीये. त्यामुळे कोविड पॉझिटिव्ह नको असेल तर फाटके कपडे घाला. हे असं सगळीकडे सुरु आहे." असे सिद्धाराम म्हेत्रे म्हणताच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना मध्येच थांबंवल आणि 'सगळे जण खरं मानतील बरं का' असे म्हणताच म्हेत्रेंसह सर्व जण हसू लागले. आणि गंभीर सुरु असलेल्या बैठकीत हशा पिकला.
म्हेत्रे साहेब तुम्ही डगमगले नसते तर निवडून आला असता - यशोमती ठाकूर
'म्हेत्रे साहेब तुम्हीपण डगमगायचं नाही. डगमगले नसता तर तुम्ही निवडून आला असता' असे म्हणत 2019 च्या निवडणुकीत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पराभवाचे कारण भर बैठकीत यशोमती ठाकूर यांनी सांगितले. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव झाला. निवडणुकांआधी म्हेत्रे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, ऐनवेळी भाजपतर्फे सचिन कल्याण शेट्टी यांना तिकीट मिळाल्याने म्हेत्रेंचा पत्ता कट झाला.
'कामं होतं नसतील तर दंगा करा' मंत्री यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
त्यामुळे माजी गृहराज्यमंत्री आणि तत्कालीन आमदार राहिलेल्या पराभवाचा सामना करावा लागला. याच पराभवाचे कारण खुद्द महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठकी दरम्यान सांगितले. यावेळी कोरोनाचे उदाहरण देत, 'कोरोना झाला नाही पाहिजे याची काळजी आपण घेतो, त्यामुळे राजकीय कोरोनाला आपण का घाबरावे, तुम्हीच इतके ताकदवान आहात की ठरवलात तर कायापालट होऊ शकतं. आपल्या मनाची परिस्थिती व्यवस्थित असली तर पाहिजे ते मिळवू शकतो.' असे म्हणत कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न देखील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.
Yashomati Thakur | 'कामं होतं नसतील तर दंगा करा' यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला