Corona Vaccination: कोरोनाची लागण झालेल्यांना लसीचा एक डोस पुरेसा; अमेरीकेत संशोधन
कोरोनाची लागण झालेल्यांना लसीचा एक डोस पुरेसा असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. अमेरीकेत हे संशोधन झाले असून यात एका भारतीय संशोधकाचा समावेश आहे.
मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्यमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली असून उपचाराअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. कोरोना साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, लॉकडाऊन हा कायमस्वरुपी पर्याय नसून वेगाने लसीकरण होणं आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. केंद्राने देशभरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरणास खिळ बसली आहे. आता याच संदर्भात एक दिलासादायक बातमी आली आहे.
ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशांसाठी लसीचा एकच डोस पुरेसा आहे, असे संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनावर जगात चर्चा सुरू झाली आहे. दुसऱ्या लाटेला सामना करत असलेल्या आणि लसीचा तुटवडा असलेल्या भारतासाठी हे संशोधन वरदान ठरु शकते. अशी तीन संशोधन जगात झाली असून अमेरिकेतल्या संशोधनाच्या तीन संशोधकांपैकी एक संशोधक भारतीय आहे.
भारताची अवाढव्य लोकसंख्या पाहता लसींचे दोन्ही डोस देण्यासाठी किमान एक वर्ष लागेल. 17 एप्रिलला सायन्स इम्युनोलॉजिकलमध्ये प्रकाशित झालेल्या पेन इंस्टीट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीच्या संशोधन जगासाठी महत्वाची ठरू शकते. जगभरात या संशोधनावर चर्चा सुरू असून 20 पानांचे हे संशोधन प्रकाशित झाल्यावर ज्यांना कोरोना झाला होता त्यांना कोरोनाचा कोणत्याही लसींचा एक डोस पुरेसा आहे असे हे संशोधन सांगते.
काय आहे संशोधन
कोरोना बाधित झालेले आणि बाधा न झालेल्या लोकांवर लसीचा पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा काय परिणाम होतो? यावर संशोधन करण्यात आले. यात कोरोनावर मात केलेल्या लोकांमध्ये एमआरएनए (mRNA) लसीच्या पहिल्या डोसनंतर अँटीबॉडी रिस्पॉन्स खूप चांगला दिसला. पण दुसऱ्या डोसनंतर इम्यून रिस्पॉन्स पहिल्यासारखा दिसला नाही. संशोधकांचा दावा आहे की ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही, त्यांच्यामध्ये अँटीबॉडी रिस्पॉन्स दुसऱ्या डोसनंतर तेवढा नव्हता. याचा अर्थ ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यांच्यासाठी करोनाच्या कोणत्याही लसीचा एक डोस पुरेसा आहे, हे स्पष्ट झालं आहे.