रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल झालेला फॉर्म बनावट, अन्न-नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा
सोशल मीडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहे. सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
मुंबई : रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही. सध्या सोशल मीडिया आणि काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असं आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाशात म्हटलं आहे की, सोशल मीडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहे. सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत.
मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राज्य सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये, असं आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या- Corona Update | राज्यातील कोरोना बाधितांचा संख्या 220 वर, आज दिवसभरात दोघांचा मृत्यू
- Corona | ज्येष्ठ नागरिकांनी 'या' गोष्टी पाळा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
- Lock Down | लॉकडाऊनचा पॉझिटिव्ह इफेक्ट; मुंबई, इटली, चीनमधील प्रदूषण घटलं!
- Coronavirus | अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा दावा
- India Lockdown | वाट दिसू दे गा देवा... लॉकडाऊनमुळे काम गेलं, घरी जाण्यासाठी धडपड